समीर कर्णुक

१९ कोटी खर्चून करण्यात आलेले काम निकृष्ट; फरशा उखडल्याने लहान मुले जखमी

नूतनीकरणाच्या नावाखाली गेल्या ११ वर्षांपासून बंद राहिल्यानंतर सुमारे महिनाभरापूर्वी खुला करण्यात आलेल्या चेंबूर येथील जनरल अरुणकुमार वैद्य तरणतलावाची दुर्दशा झाली आहे. १९ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत करण्यात आलेल्या या तलावातील फरशा उखडू लागल्या असून त्यात अडकून लहान मुले जखमी होत आहेत. त्यामुळे या तलावाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे.

चेंबूरमधील पालिकेच्या ‘एम पश्चिम’ कार्यालयालगत हा जनरल अरुणकुमार वैद्य तलाव असून १९९२ हा तलाव या ठिकाणी बांधण्यात आला होता. मात्र पालिकेडून तलावाची योग्य देखभाल न झाल्याने काही वर्षांतच त्याची दुरवस्था झाली. हा धोकादायक तलाव पालिकेने २००७ ला सर्वसामान्यांसाठी बंद केला. त्यानंतर अनेक वर्षे तलाव बंद अवस्थेतच होता. या ठिकाणी चांगल्या दर्जाचा तलाव पालिकेने बांधावा, अशी मागणी राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि रहिवाशांकडून करण्यात येत होती. मात्र पालिकेने या मागणीकडे अनेक वर्षे दुर्लक्ष केल्याने या तलावासाठी अनेकदा आंदोलनेदेखील करण्यात आली. अखेर पालिकेने तलावासाठी १९ कोटींचा निधी मंजूर करीत ऑलिम्पिक दर्जाचा तलाव या ठिकाणी उभारला.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या तलावाची पाहणी केल्यानंतर १ सप्टेंबरपासून हा तलाव सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला. लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी असे दोन तलाव या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत. यातील लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या तलावातील टाइल्स आठ दिवसांपूर्वी अचानक निघाल्या. फरशांच्या धारदार कडा पायाला लागून पोहण्यासाठी येणारी चार ते पाच मुले जखमी झाली. ही बाब देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लहान मुलांचा तलाव सध्या पोहण्यासाठी बंद केला आहे.

प्रवेश शुल्क सामान्यांच्या आवाक्याबाहेर

पूर्वी या तलावामध्ये पोहण्यासाठी मासिक, त्रमासिक, सहामासिक आणि वार्षिक अशा चार प्रकारे शुल्क घेण्यात येत होते. हे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे होते. मात्र सध्या केवळ वार्षिक शुल्क भरूनच प्रवेश दिला जात आहे. लहान मुलांसाठी वार्षिक ४ हजार ५४०, प्रौढांसाठी ७ हजार २०० आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ हजार ५४० रुपये असा दर ठेवण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना हे शुल्क परवडणारे नाही, याकडे कैलास अरवडे या सामाजिक कार्यकर्त्यांने लक्ष वेधले. त्यांनी पालिकेकडे शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे.