सागरी जीवसृष्टी नष्ट होण्याचे केंद्रीय सागरी मत्स्य व्यवसाय संस्थेचे प्राथमिक निरीक्षण

सागरी किनारा मार्गामुळे मासेमारी आणि मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर नक्की काय परिणाम होणार आहे, याचा विस्तृत अभ्यास ‘केंद्रीय सागरी मत्स्य व्यवसाय संस्थे’कडून होणार असला तरी याच संस्थेने मार्च महिन्यात दोन दिवस केलेल्या प्राथमिक पाहणीत या मार्गावरील समुद्री जीवसृष्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता याच संस्थेला पुन्हा सखोल सर्वेक्षणाचे कंत्राट देण्यात येणार असल्यामुळे यातील अहवालाबाबत पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमारांमध्ये उत्सुकता आहे. सागरी जीवसृष्टीवर परिणाम होणार असल्याने किनारा मार्गाच्या प्रकल्पामुळे तीन हजार कुटुंबांच्या व्यवसायावर टांगती तलवार असणार आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल त वांद्रे वरळी सागरी सेतूचे वरळीकडील टोक यादरम्यान किनारा मार्गाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे समुद्री जीवसृष्टी धोक्यात येणार असून मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या मच्छीमारांचा उदरनिर्वाहदेखील जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित आणि वरळी मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था यांनी पालिकेला कोर्टात खेचले आहे. पालिका  प्रशासनाने मासेमारीवरील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संस्था नियुक्त करण्याचे ठरवले आहे. वर्सोवा येथील भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) केंद्रीय सागरी मत्स्यव्यवसाय संशोधन संस्था (सीएमएफआरआय), मुंबई संशोधन केंद्र या नामांकित संस्थेची निवड करण्यात आली आहे, परंतु या संस्थेने आधीच २२ मार्च आणि २५ मार्च अशा दोन दिवसांत मासेमारीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी धावते सर्वेक्षण केले होते. कोस्टल रोड ज्या ठिकाणी बांधला जाणार आहे तेथील आसपासच्या विभागात समुद्रात होणाऱ्या मासेमारीबाबत हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

या प्रकल्पामुळे नुसत्या वरळी परिसरातील ३०५५ मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर दर वर्षी या भागातून सुमारे २००० टनांपेक्षाही अधिक मासे उपलब्ध होत असतात. या भागातून बोंबील, कोळंबी, शेवंड, जवळा, खेकडे, कालवे असे मासे मिळतात.

कालव्याची शेती धोक्यात

कोस्टल रोड ज्या भागात होणार आहे त्या भागात कालव्यांची पैदास मोठय़ा प्रमाणावर होते. हा संपूर्ण परिसर खडकाळ असून अशा खडकावरच ही कालवे तयार होत असतात. ही शेती नष्ट होण्याचा धोका या अहवालात व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे या शेतीवर अवलंबून असलेल्या महिला मच्छीमारांचा रोजगार बुडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कोणत्याही निष्कर्षांप्रत येण्यापूर्वी सखोल अभ्यास करण्याची गरजही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पालिका आता नव्याने या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करणार आहे.  मात्र धावत्या सर्वेक्षणात आलेले निष्कर्ष सखोल सर्वेक्षणात बदलले जाऊ नये, अशी अपेक्षा याचिकाकर्ते नगर नियोजनकार श्वेता वाघ आणि मच्छीमार संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

* एकूण बोटी –  १४६

* मच्छीमार – ८७२

* वरळी कोळीवाडय़ातील एकूण मच्छिमार – ८००

* पारंपरिक कोळी कुटुंबे – ७४१

* एकूण मच्छिमारांची लोकसंख्या – ३०५५ (मुले व महिला यांचा समावेश)

* यापैकी काही जण समुद्रात जाऊन मासेमारी करतात, तर काही जण मासे विकण्याचे काम करतात, काही फक्त कामगार म्हणून बोटीवर असतात.