अंतर नियमांच्या अंमलबजावणीबाबत आतापर्यंत फारसे आग्रही नसलेल्या मुंबई पोलिसांनी सोमवारी याच नियमांचा आधार घेत शहराच्या वेशीवर अनेक वाहने जप्त केली. या कारवाईने ठाणे, वाशी, ऐरोली, मीरा रोड येथे  वाहतूक कोंडी झाली.

नियम धुडकावणाऱ्या अनेक वाहनचालकांना वेशीवरूनच बाहेर पिटाळण्याऐवजी शहरात आल्यानंतर वाहनजप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. वाहन जप्त झाल्याने  घर गाठताना अडचणींचा सामना करावा लागला. कारवाईतून मुंबई पोलीस काय संदेश देऊ इच्छित आहेत, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर होती.

रविवारी पोलिसांनी जारी केलेल्या निर्बंधांमध्ये वैध कारणाशिवाय स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी वाहने जप्त केली जातील, असा उल्लेख होता. त्यानुसार सोमवारी पहाटेपासून मुंबईच्या वाशी, मुलुंड, दहिसर, ऐरोली या पाच टोलनाक्यांवर पोलिसांनी नाकाबंदी लावली. पोलिसांनी बाहेरून मुंबईच्या हद्दीत वाहने येऊ दिली आणि नंतर जप्ती, गुन्हे नोंदवण्याची कारवाई केली. पडताळणी करून ते वाहन पुढे सोडणे किंवा जप्त करणे हा निर्णय घ्यायला बराच वेळ लागत होता. परिणामी पुणे, नाशिक, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कोकणातून मुंबईच्या दिशेने आलेली वाहने खोळंबली

टोलनाक्यांपलीकडे ही तपासणी करून, वाहने जप्त करण्याऐवजी ती माघारी धाडली असती, पुढल्या वेळी वाहन जप्त होईल असा इशारा दिला असता तर मुंबईच्या वेशीवर वाहतूक कोंडी घडली नसती अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

परवानगी घेणारेही कोंडीत

दुसऱ्या जिल्ह्य़ात प्रवास करताना वेशीवरील तपासणी नाक्यांवर ई पास नसलेली वाहने माघारी धाडली जातात.आजच्या या कारवाईने कर्तव्यासाठी बाहेरून येणारे पोलीस, दूध, भाजीपाल्यासह प्रवासाची मुभा असलेली वाहनेही या कोंडीत अडकून पडल्याचे चित्र होते.

वाहने सोडविण्यासाठी संबंधितांना त्रास

वाहन जप्त झालेल्यांना, ते सोडवण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या फे ऱ्या माराव्या लागणार आहेत. त्यासाठी चालक, मालकवर्गाला मुंबईत यावेच लागेल. शिवाय नोंद झालेल्या गुन्ह्य़ांच्या निपटाऱ्यासाठीही नागरिकांना मुंबईत चकरा माराव्या लागतील. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस सापळा रचतात. आजच्या कारवाईत तसाच अनुभव मुंबईसह विविध शहर, जिल्ह्य़ांमधून आलेल्या नागरिकांनी घेतला, अशी टीकाही पोलिसांवर होत आहे.

मुंबई पोलिसांकडून रविवारीच निर्बंध आणि कारवाईबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या कारवाईने नागरिकांमध्ये स्पष्ट संदेश गेला. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहील.

– प्रणय अशोक, प्रवक्ते , मुंबई पोलीस