अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ११ जिल्हे बाधित

राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे ११ जिल्ह्य़ांतील ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील एक लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून बुलढाणा, अमरावती, जालना जिल्ह्य़ाला सर्वाधिक फटका बसल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी दिली. या आपत्तीमुळे गहू, हरभरा, ज्वारी व रब्बी हंगामामधील केळी, संत्र्यासारख्या पिकांची हानी झाली आहे.

विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम; तसेच मराठवाडय़ातील बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या ११ जिल्ह्य़ांतील काही भागांत शेतीचे तसेच कापणी झालेल्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत पंचनामे करण्याचे आदेश रविवारी कृषिमंत्र्यांनी दिले होते.

त्यानुसार या बाधित जिल्ह्य़ांमध्ये कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पाहणी केली. महसूल प्रशासन व कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

बीड जिल्ह्य़ातील माजलगाव, गेवराई, शिरूर या तीन तालुक्यांतील ४२ गावांतील १० हजार ६३२ हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला याचा समावेश आहे. जालना जिल्ह्य़ातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड या पाच तालुक्यांतील १७५ गावांमधील ३२ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्य़ातील सेलू व जिंतूर तालुक्यांमधील २३ गावांतील तीन हजार ५९५ हेक्टर क्षेत्रांवरील शेतीचे नुकसान झाले. जालना व परभणी जिल्ह्य़ातही रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्य़ात जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या तीन तालुक्यांतील ३८ गावांमधील दोन हजार ४९५ हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहू, कांदा व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्य़ाला बसला असून चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या १० तालुक्यांतील २८६ गावांमधील ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळ व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजनगाव सुर्जी व चिखलदरा या आठ तालुक्यांतील २७० गावातील २६ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्य़ातील मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, परतूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यांतील १०१ गावांमधील चार हजार ३६० हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.

वाशिम जिल्ह्य़ातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील ३६ गावांमधील आठ हजार ५०९ हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्य़ातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या पाच तालुक्यांमधील ५९ गावांतील दोन हजार ६७९ क्षेत्रावरील ज्वारी, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. उमरगा व उस्मानाबाद या दोन तालुक्यांतील २६ गावांमधील ५८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्य़ातील सेनगाव व औंढा या दोन तालुक्यांतील ३० गावांमधील १४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्राचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून स्थानिक पातळीवरून पुढील दोन ते तीन दिवसांत नुकसानाचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, असे फुंडकर यांनी सांगितले.

निधीची अडचण येणार नाही

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचा आढावा घेण्यात येत आहे. पंचनामे सुरू झाले आहेत. पंचनाम्यांचा अहवाल आला की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीची बैठक होईल व मदतीचे स्वरूप निश्चित होईल.  शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची कसलीही अडचण येणार नाही. पंचनामे झाले की लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना मिळेल, असे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार यांनी सांगितले.

गारपीट, वादळी पावसाचा इशारा

पुढील ४८ तासांमध्ये विदर्भात गारपीट होण्याचा तर मराठवाडय़ाच्या बहुतांश भागात वादळीवाऱ्यांचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळाला असून दक्षता घेण्याचे आवाहन आपत्ती निवारण कक्षाने केले आहे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे,  मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी व ट्रॉन्स्फॉर्मरजवळ थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.