सुशांत मोरे

‘क्यूआर कोड’ सुविधेचा सहा हजार प्रवाशांकडून वापर; आणखी तपासनीसांना ‘क्यूआर कोड’ ओळखपत्रे

तोतया तिकीट तपासनीसांना (‘टीसी’) आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर ‘टीसी’ना दिलेल्या क्यूआर कोडद्वारे तब्बल सहा हजार प्रवाशांनी ‘टीसी’चीच ‘तपासणी’ केली असून या उपक्रमाला मिळणारा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेने अधिकाधिक ‘टीसी’ना हे क्यूआर कोड असलेली ओळखपत्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘टीसी’करिता मात्र ही क्यूआर कोडची तपासणी डोकेदुखी ठरते आहे.

अनेकदा तोतया ‘टीसी’कडून प्रवाशांना लुबाडले जाते. तोतया ‘टीसी’मुळे रेल्वे प्रशासनाची बदनामी होते. अशा अनेक तक्रारी आल्याने मध्य रेल्वेने आपल्या ‘टीसी’ना क्यूआर कोड असलेली नवीन ओळखपत्रे दिली. या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीट तपासनीस अधिकृत आहे की नाही ते समजते. त्याचा फायदा घेत आतापर्यंत सहा हजार प्रवाशांनी ‘टीसी’च्या गळ्यातील त्यांची ओळखपत्रे मोबाइलच्या मदतीने स्कॅन करून ते अधिकृत आहेत याची खात्री केल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. याचा प्रवाशांबरोबरच रेल्वेलाही फायदा होत असल्याचे रेल्वेचे म्हणणे असून या योजनेची व्याप्ती आणखी वाढविली जाणार आहे.

‘टीसीं’करिता मात्र ही ‘तपासणी’ तापदायक ठरते आहे. गर्दीच्या वेळी आणि जिथे नेटवर्क नाही तिथे प्रवाशी क्यूआर कोड तपासू लागले की विनाकारण वेळ वाया जातो. पुन्हा जोपर्यंत नेटवर्क येऊन क्यूआर कोड स्कॅन होत नाही तोपर्यंत प्रवासी तिकीट दाखवीत नाहीत. त्यामुळे विनाकारण ताटकळत राहावे लागते, अशी कैफियत एका तिकीट तपासनीसाने मांडली.

गेल्या काही वर्षांत तोतया ‘टीसी’ मोठय़ा प्रमाणात पकडले गेले.  त्याला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. ‘टीसीं’ना क्यूआर कोड असलेले ओळखपत्रच देण्यात आले आहे. हा क्यूआर कोड रेल्वेच्या सव्‍‌र्हरशी जोडण्यात आला आहे. त्यात ‘टीसीं’ची सर्व माहिती उपलब्ध आहे. या ओळखपत्रावरील क्यूआर कोड प्रवासी आपल्या मोबाइलच्या मदतीने स्कॅन करताच प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवर ‘टीसी’ची सर्व माहिती उपलब्ध होते. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात ही सुविधा प्रथम ठाणे स्थानकात सुरू करण्यात आली. त्यानंतर अन्य स्थानकांतही सेवा उपलब्ध केली गेली.

आणखी ४५० ‘टीसीं’ना नवीन ओळखपत्रे

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील १,३५० ‘टीसी’पैकी ९०० ‘टीसीं’ना क्यूआर कोड ओळखपत्र देण्यात आले आहे. हा कोड सहा हजार प्रवाशांनी स्कॅन करून रेल्वेचेच अधिकृत टीसी असल्याचे तपासून पाहिले आहे. प्रवाशांकडूनही त्याचा होणारा वापर पाहता आणखी ४५० ‘टीसी’नाही अशाच प्रकारचे ओळखपत्र देण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या सीएसएमटी ते कल्याणपर्यंत बहुतांश स्थानकात ही सुविधा आहे. यात गर्दीच्या दादर, कुर्ला, ठाणेसह आणखी काही स्थानकातील प्रवाशांनी या सेवेचा फायदा घेतल्याचे सांगितले.