मुंबई : मालाड पश्चिामेकडील लिंक रोडवरील ‘डी मार्ट’ला पालिके ने सील ठोकले आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करीत सामान खरेदीसाठी शनिवारी लोकांची गर्दी या दुकानात झाली होती. व्यवस्थापनाने करोनाचे कोणतेही नियम न पाळल्यामुळे व्यवस्थापनाला पालिके च्या पी उत्तर विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

स्टोअरमध्ये करोना संसर्ग प्रतिबंधक नियमांचे कोणतेही पालन यावेळी केले नव्हते. डी मार्टच्या कर्मचाऱ्यांनी, विशेषत: बिल तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुखपट्ट्या आणि हातमोजे यांचा वापर केलेला नसल्याचे पालिके च्या पथकाला आढळून आले.  तसेच कर्मचारी आणि ग्राहक हे सर्व जण वावरत असताना सुरक्षित अंतराचे नियम पाळत नसल्याचेही निदर्शनास  आले.

एकाच वेळी  ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उपस्थिती नियमाचादेखील भंग केल्यामुळे डी मार्ट व्यवस्थापनावर ही कारवाई  केल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.  नियमांचे पालन होत नसल्याने सदर डी मार्ट व्यावसायिक आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद (सील) करण्यात आले आहे. तसेच डी मार्टच्या संबंधित व्यवस्थापकास नियम भंगबाबत नोटीस बजावून, परवाना रद्द का करण्यात येऊ नये, याविषयी तीन दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देखील पी/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिले आहेत.