News Flash

संशोधकांकडून ऐतिहासिक चित्रफितींची उजळणी

फिल्म्स डिव्हिजनमध्ये जुनी मुंबई, युद्धासंदर्भातील चित्रफिती पाहण्यासाठी गर्दी

(संग्रहित छायाचित्र)

फिल्म्स डिव्हिजनमध्ये जुनी मुंबई, युद्धासंदर्भातील चित्रफिती पाहण्यासाठी गर्दी

भक्ती परब, मुंबई

देशभक्तिपर चित्रपटांचा वाढता प्रभाव, ऐतिहासिक चित्रपटांची वाढती संख्या यामुळे एकंदरीतच भारतीय स्वातंत्र्यलढय़ापासून, भारत-पाक, भारत-चीन युद्ध ते जुन्या मुंबईतील जनजीवन अशा अनेक विषयांबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. अनेक संशोधक सध्या फिल्म्स डिव्हिजनकडे धाव घेत आहेत.

युद्ध, फाळणीसारख्या ऐतिहासिक घटना, भारतातील जुनी शहरे यासंदर्भातील चित्रफिती पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हल्लीच प्रदर्शित झालेले ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’सारखे युद्ध घटनांवरचे आणि ऐतिहासिक चित्रपट, पाठोपाठ आगामी ‘पानिपत’, ‘केसरी’, ‘तानाजी’सारख्या ऐतिहासिक चित्रपटांची लागलेली रांग यामुळे सध्या प्रेक्षकांबरोबरच अभ्यासक, संशोधकांमध्येही त्याघटनांचे संदर्भ शोधण्याची, तसेच ते पडताळून पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. पेडर रोडवरील गुलशन महल येथे उभारण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या भव्य चित्रपट संग्रहालयाला लागूनच फिल्म्स डिव्हिजनचे कार्यालय आहे. या संग्रहालयाबरोबरच फिल्म्स डिव्हिजनला भेट देऊन चित्रपट लेखक, दिग्दर्शक आणि एकूणच सिनेसंशोधक भारताचा गौरवशाली इतिहास, १८५७ चा स्वातंत्र्यलढा, जुनी मुंबई, भारतातील जुनी शहरे, काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना यांची इथे तासन्तास पारायणे करत असल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.

१९४८ मध्ये स्थापना झालेल्या फिल्म्स डिव्हिजनने  आठ हजार दुर्मीळ चित्रपट शीर्षकांचे जतन केले आहे. यामध्ये विविध विषयांवरील माहितीपट, लघुपट आणि अ‍ॅनिमेशनपटांचा समावेश आहे. इथे संशोधकांना हा दुर्मीळ  खजिना संगणकावर पाहता येतो. शिवाय काही फुटेज हवे असल्यास (२० सेकंदांपासून १० मिनिटांपर्यंतचे फुटेज) सशुल्क उपलब्ध करून दिले जाते.

या संग्रहालयात संशोधक, सिनेअभ्यासक, शाळा-महाविद्यालयांतील मुलेही अशा चित्रफितींचा अभ्यास करताना दिसतात. देशभरातील घटना आणि युद्धपट, ऐतिहासिक पटांचा वाढता प्रभाव यामुळे येत्या काही दिवसांत यासंदर्भातील चित्रफितींना असणारी मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चित्रपट संग्रहालयात उपलब्ध असलेला सगळा ऐवज नावानुसार विभागवार डिजिटल स्वरूपात संग्रहित आहे. त्यामुळे संगणकावर संदर्भ विषय, निर्माता, दिग्दर्शक, कलाकारांनुसार किंवा विभागवार शोध घेता येतो. ऐतिहासिक विभागाला जास्त पसंती दिली जात आहे. भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास, जुनी मुंबई, काही ऐतिहासिक युद्ध, काही ऐतिहासिक घटना यांना संशोधक अधिक प्राधान्य देतात.

– अमोल आमले, पर्यवेक्षक, चित्रपट संग्रहालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2019 3:50 am

Web Title: crowd rush in films division to see old mumbai and war related videos
Next Stories
1 आता ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ 
2 ‘एचडीआयएल’च्या घरांचे तीन महिन्यांमध्ये वितरण
3 प्रिया दत्त निवडणूक रिंगणात
Just Now!
X