दिवस भरण्याआधीच जन्माला आलेले एक बाळ चुकीच्या उपचारांनी दगावल्याचा आरोप करत वांद्रे येथील भाभा रुग्णालयात जमावाने धुडगूस घातला. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे बाळ दिवस भरण्याआधीच जन्मल्याने अशक्त होते. त्यातच या बाळाला गॅस्ट्रो झाल्याने त्याची स्थिती अधिकच नाजूक झाली. त्यामुळेच या बाळाचा मृत्यू झाला. अखेर पोलिसांनी भाभा रुग्णालय परिसरात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
वांद्रे येथे राहणाऱ्या रेश्मा सर्फराज शेख यांनी २६ जुलै रोजी भाभा रुग्णालयातच एका बाळाला जन्म दिला. हे बाळ दिवस पूर्ण होण्याआधीच झाल्याने अशक्त होते. त्यामुळे त्या २४ ऑगस्टपर्यंत रुग्णालयातच बाळासह होत्या. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र या बाळाला गॅस्ट्रो झाल्याने २८ ऑगस्टला पुन्हा भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती नाजूक असल्याने ते उपचारांनाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे भाभा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले. मात्र या बाळाचा मृत्यू चुकीचे उपचार केल्याने झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी भाभा रुग्णालयाबाहेर धुडगूस घातला. घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.