04 July 2020

News Flash

बाजारपेठा फुलू लागल्या!

गोंधळामुळे एका बाजूची दुकाने बंद करण्याचे आवाहन पोलिसांना करावे लागले.

छाया : दीपक जोशी

राज्यभरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी; संभ्रमामुळे काही भागांत गोंधळ

दुकाने उघडण्यात आल्यामुळे राज्यभरात शहरांतील बाजारपेठा तब्बल ७२ दिवसांच्या विरामानंतर फुलू लागल्या. युवती आणि महिलांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या पुण्यातील तुळशीबाग परिसराने शुक्रवारी गजबज अनुभवली. तर मुंबई-ठाणे आणि नागपूर शहरांमध्ये सम-विषमबाबत संभ्रमामुळे रस्त्यांवर दुतर्फा दुकाने सुरू झाली. काही काळ त्यामुळे गोंधळ उडाला असला, तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंखेरीज खरेदी करता आली.

कोणती दुकाने कधी खुली ठेवायची याबाबतचे आदेश जारी करण्यात महापालिकांच्या काही विभाग कार्यालयांकडून झालेला विलंब, तर काही विभागांनी केलेले नियोजन दुकानदारांपर्यंत न पोचल्याने पहिल्याच दिवशी काही शहरांत संभ्रमाचे वातावरण होते.  गोंधळामुळे एका बाजूची दुकाने बंद करण्याचे आवाहन पोलिसांना करावे लागले.

मुंबईत काही भागांत पोलिसांकडून कारवाई होऊ नये या भीतीपोटी काही दुकानदारांनी दुकाने एका बाजूची बंद केली. मात्र, पोलीस निघून गेल्यानंतर ती उघडण्यात आली.

गोंधळाचे कारण..

पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांनी आपापल्या हद्दीतील दुकाने कशा पद्धतीने उघडता येतील याचे नियोजन करून त्याबाबत परिपत्रक जारी करणे अपेक्षित होते. काही विभागांमध्ये हे परिपत्रक जारी करण्यात आले. मात्र ही माहिती दुकानदारांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे मुंबईत रस्त्यांच्या दोन्ही बाजूची दुकाने उघडण्यात आली. ठाणे आणि नागपूर शहरांमध्येही अशीच परिस्थिती होती.

ठाणे जिल्ह्य़ात गजबज..

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील राम मारुती रोड, गोखले रोड आणि तलावपाळी भागातील मोठय़ा आस्थापना, ठाणे मुख्य बाजारपेठ, जांभळीनाका भाजी मंडई, खारकर आळी तसेच शहरातील इतर भागात शुक्रवारी सकाळी दुकाने सुरू  झाली.  दुकानांबाहेर चौकटी आखण्यात आल्याने सामाजिक अंतराचा नियम पाळला जात होता. भिवंडी शहरातही रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. कल्याण-डोंबिवली शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये सर्वच दुकाने खुली झाल्याने गर्दी खूप झाली होती. उल्हासनगरात  शहराच्या बाहेरचे अनेक ग्राहक हे घाऊक खरेदीसाठी शहरात आल्याने विविध भागांतील रस्ते गर्दीने फुलून गेले.

थोडी वर्दळ.. पहिल्याच दिवशी अनेकजण खरेदीसाठी बाहेर पडल्याने सर्वच शहरांमधील रस्त्यांवर  वर्दळ होती. काही ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळले गेले, तर काही ठिकाणी त्यांची पायमल्ली झाली. दुपारनंतर मात्र खरेदीदारांची गर्दी ओसरली.

वाहतूक कोंडी : मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज भासत नसल्याने शुक्रवारी सकाळी आनंदनगर टोलनाका परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या खासगी वाहनांची वर्दळ वाढली होती. शिळफाटा मार्गावरील वाय जंक्शन परिसरात अवजड वाहतुकीमुळे कोंडी झाली होती.

मालाचा तुटवडा : शुक्रवारपासून दादर, लालबाग, परळ, भायखळा येथील बाजारपेठा खुलल्या असल्या तरी मालाचा तुटवडा, मजुरांची कमतरता, दळणवळणाची बोंब यामुळे पहिल्या दिवशी दुकानदारांचा भर दुकानातील धूळ झटकण्यावर राहिला.या बाजारपेठांमधील २० ते ३० टक्के दुकाने खुली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 12:48 am

Web Title: crowds for shopping across the state abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 बाजार समित्या गुंडाळण्यात अपयश!
2 बदलापूर : करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, शुक्रवारी ७ नवीन रुग्णांची भर
3 धक्कादायक…अर्नाळ्यात करोनाबाधिताच्या अंत्यसंस्कारास पाचशेहून अधिक उपस्थिती
Just Now!
X