धार्मिक स्थळांवरील भाविकांच्या गर्दीत वाढ; मंदिर व्यवस्थापनांची चोख व्यवस्था, मात्र भाविकांची बेफिकीरी

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात खुल्या झालेल्या धार्मिक स्थळांवर तेथील व्यवस्थापनांकडून करोनाविषयक र्निबधांचे पालन करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी, भाविकांना मात्र याचा विसर पडू लागला आहे. गेल्या महिनाभरात मंदिरे, दर्गा याठिकाणी भाविकांची गर्दी वाढू लागली असून येथे अंतर नियमांचे अजिबात पालन होताना दिसत नाही. परिणामी करोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

टाळेबंदीत मंदिरांना लागलेले कुलूप ८ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आले. सुरुवातीच्या काळात भाविकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. आता मार्गशीर्ष महिन्यादरम्यान मंदिरातील गर्दी वाढत गेली. संपूर्ण मार्गशीर्ष महिना आणि त्यानंतर मुंबईतील सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिर, तसेच हाजीअली दर्गा येथे भाविक आवर्जून भेट देऊ लागले आहेत. परंतु या वाढत्या गर्दीत सामाजिक अंतराच्या नियमाचे भाविकांकडून उल्लंघन होत आहे. मंदिर प्रशासनाकडून लोकांना विनंती करूनही लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, असे मंदिर प्रशासनांचे म्हणणे आहे.

‘मुंबादेवी देवस्थान बाजारपेठ परिसरात असल्याने खरेदीसाठी येणारा ग्राहकवर्ग आवर्जून दर्शनासाठी येतो. अनेक व्यापारी दररोज नित्यनियमाने देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने १२ महिने मंदिरात गर्दी असते. गर्दीचे व्यवस्थापन करता यावे यासाठी सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत मंदिर खुले ठेवले आहे. प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण फवारणीचे यंत्र बसवले आहेत. लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरक्षा रक्षकही वाढवण्यात आले आहेत. परंतु अंतराचा नियम पाळताना लोक आमच्याशी हुज्जत घालतात. विशेषकरून कुटुंब किंवा पती-पत्नी असतील तर त्यांना एकत्रच दर्शन घ्यायचे असते. त्यामुळे अनेकदा आमचाही नाईलाज होतो,’ असे मुंबादेवी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी सांगितले.

सध्या सर्वच मंदिरात दिवसाला आठ ते दहा हजार भाविक येत आहेत. त्यातही शनिवार आणि रविवार विशेष गर्दी असते. महालक्ष्मी मंदिराच्या आत नियम पाळले जात असले तरी मंदिराच्या बाहेरील परिसरात मात्र मोठी गर्दी होत आहे. याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. ‘मंदिराच्या पहिल्या पायरीपासून ते मंदिरात सर्व नियम पाळले जात आहेत. प्रसाद, ओटी याचा स्वीकार आम्ही करत नाही. मंदिरापासून ते बाहेरील रस्त्यापर्यंत सहा फुटांवर आखणी केली आहे. पण मंदिराच्या बाहेरील परिसर पालिकेच्या ताब्यात असल्याने प्रसादाची दुकाने, ओटी आणि धार्मिक साहित्याची दुकाने सर्रास खुली आहेत. त्यावर मंदिर प्रशासन र्निबध घालू शकत नाही. मंदिराच्या बाहेर असलेल्या छोटय़ा मंदिरात आता धार्मिक विधी केले जातात. याला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा’ असे मंदिराचे प्रमुख शरदचंद्र पाध्ये यांनी सांगितले. याला सिद्धिविनायक मंदिर अपवाद आहे. इथे मात्र दर्शनासाठी ऑनलाईन प्रवेश पद्धती असल्याने प्रत्येक व्यक्तीची निर्जंतुकीकरण प्रक्रिया आणि सामाजिक अंतर काटेकोरपणे पाळले जात आहे.

सिद्धिविनायकमध्ये अद्ययावत सुविधा

सरकारचे सर्व नियम पाळले जावे याच अनुषंगाने यंत्रणा निर्माण केली आहे. क्यूआर कोड प्रणाली असल्याने प्रत्येकाच्या दर्शनाची तारीख आणि वेळ पूर्वनियोजित असते. त्यामुळे गर्दी होत नाही. आत येताना भाविकाचे नाव, संपर्क क्रमांक, फोटो याची छाननी करून, तापमान तपासून मगच मंदिरात प्रवेश दिला जातो. या सर्व गोष्टींची नोंद मंदिर प्रशासनाकडे होते. मग मुख्पट्टी, निर्जंतुकीकरण आदींची पूर्तता करून हात पाय धुण्याचा व्यवस्था केली आहे. या सर्व प्रक्रियेत एक माणूस दर्शन घेताना दुसऱ्या माणसामध्ये अपोआपच सहा फुटांचे अंतर राखले जाते, असा दावा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केला.