बंद असलेली ग्रंथालये आणि दुकानांमुळे जुन्या-नव्या पुस्तकखरेदीचा मार्ग खुंटल्याने मराठी वाचकांची झालेली गेल्या दोन महिन्यांतील परवड या आठवडय़ात संपुष्टात आली. गेल्या आठवडय़ापासून पुण्यात आणि शुक्रवारी ठाण्यात उघडलेल्या ग्रंथदालनामध्ये लाखो रुपयांची मराठी पुस्तकविक्री झाली असून टाळेबंदीनंतर पुस्तके खरेदीसाठी वाचक फिरकणार नाहीत, ही भीती खोटी ठरली आहे.

ठाण्यातील राम मारूती रस्त्यावरील मॅजेस्टीक बुक डेपो शुक्रवारी खुला झाला. पुस्तकांची विक्री सुरु झाल्याने शहरातील १०० हून अधिक वाचकांनी चोवीस तासात पुस्तक खरेदीसाठी येथे गर्दी केली. साहित्यप्रेमींचे आगर असलेल्या पुण्यामध्येही पुस्तकांच्या खरेदीला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. येथे ललित आणि ललितेतर विषयांच्या पुस्तकांची लाखो रुपयांची खरेदी झाल्याचे दिसत आहे.

ठाण्यातील मॅजेस्टिक बुक डेपो येथे सकाळी दुकान खुले झाल्यापासूनच ग्राहकांनी आत्मचरीत्र, कथा आणि विज्ञान विषयक पुस्तकांची जोरदार खरेदी केली. प्रत्येक ग्राहकाने किमान पाच ते सहा पुस्तके नेल्याचे मॅजेस्टीक बुक डेपोमधील संजय जोशी यांनी सांगितले.  पुण्यातील ‘अक्षरधारा बुक गॅलरी’चे रमेश राठिवडेकर म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या बाजीराव रस्ता येथील दुकानामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये दीड लाखांहून अधिक रकमेच्या पुस्तकांची विक्री झाली. आठवडाभर हे दुकान अर्धा वेळ तर, शुक्रवारपासून सकाळी दहा ते पाच या वेळात उघडे असते. कोथरूड येथील दुकान १५ दिवसांपासून पूर्ण वेळ उघडे असून तेथे दोन लाख रुपयांहून अधिक रकमेच्या पुस्तकांची विक्री झाली आहे.

‘रसिक साहित्य’चे शैलेश नांदूरकर म्हणाले, तीन दिवसांपासून सम-विषम पद्धतीने दुकान उघडण्यास परवानगी मिळाली असल्याने दोनच दिवस साहित्यप्रेमींना सेवा देता आली. साधारणपणे ८० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. अप्पा बळवंत चौकात येण्याची अजूनही भीती वाटते अशा ग्राहकांना घरपोच सेवा देण्यात येत आहे. वाचकांना सॅनिटाइज करून पुस्तके दिली जात आहेत. मुख्य म्हणजे पुस्तके खरेदी करताना ग्राहकांकडून सवलतीचा आग्रह केला जात नाही.

वाचकभूक.. गेले दोन महिने अधिकाधिक लोक आपल्या घरात अडकून होते. या कालावधीत घरात बसून ऑनलाइन पुस्तके विकत घेता आणि वाचता येत असली, तरी बऱ्याच वाचकांना मूळ स्वरूपातील पुस्तकच हाताळण्याची इच्छा असते. टाळेबंदी काळात या पुस्तकांची विक्री सर्वाधिक होऊ शकली असती. अनेक प्रकाशक आणि पुस्तकविक्रेत्यांकडे वाचक दूरध्वनीवरून पुस्तके मागत असली, तरी ती त्यांना घरपोच पोहोचविण्याची कोणतीच यंत्रणा नव्हती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत वाचकांची भूक आणखी वाढली आहे.

टाळेबंदी शिथिल झाल्यामुळे नागरिक पहिल्या दिवशी पुस्तक खरेदीकडे वळतील असे वाटले नव्हते. मात्र, शुक्रवारी सकाळपासून ठाण्याच्या राम मारूती रोड परिसरात असलेले मॅजेस्टीकचे दुकान उघडल्यावर नागरिकांनी पुस्तक खरेदीसाठी हजेरी लावली. पहिल्याच दिवशी दुकान गजबजलेले पाहायला मिळाले. – अशोक कोठावळे, मॅजेस्टीक प्रकाशन

शासनाचे आदेश सुस्पष्ट नसल्यामुळे सध्या दुकान बंद आहे. पुढील आठवडय़ापासून दुकान उघडण्यात येणार आहे. टाळेबंदीच्या काळात पुस्तकांसाठी ऑनलाइन पद्धतीने मागणी चांगली आली. मात्र, कुरियर सेवा बंद असल्याने ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत.

– सुप्रिया लिमये, ‘बुकगंगा’