सरत्या वर्षांला निरोप देत नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी गिरीस्थाने आणि सागरी किनाऱ्यांकडे पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. जवळच्या, पण नव्या पर्यटन स्थळांकडे कल वाढला आहे. गडकिल्ल्यांवर तसेच जलाशयांच्या काठांवर ‘कॅम्पिंग’ला पर्यटक अधिक पसंती देत आहेत.

मोठी सुट्टी घेऊन राज्याबाहेर पर्यटनास जाण्यापेक्षा जवळच्या ठिकाणी दोन-तीन दिवसांची सहल करण्याकडे कल आहे. नाताळच्या सुट्टीपासूनच नववर्षांचे वेध लागले असून माथेरान, दापोली, अलिबाग, भंडारदरा, तारकर्ली याकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. वर्षांअखेरच्या काळात कौटुंबिक सहलींचा प्रतिसादही वाढला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या जवळपास सर्वच ठिकाणची रिसॉर्ट हाऊसफुल्ल आहेत. दापोली, माथेरानमधील अनेक हॉटेल्स हाऊसफुल्ल असल्याचे किंवा अगदीच मर्यादित जागा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये जाऊन नव्या वर्षांचे स्वागत करण्याऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या ठिकाणी स्वागताचा जल्लोष करण्याचा कल वाढला आहे. त्याच अनुषंगाने भंडारदऱ्याजवळील साम्रद, पवना, बामणोली, देवकुंड या ठिकाणी कॅम्पिंगची मागणी वाढली आहे. अशा ठिकाणी किमान पन्नास व्यावसायिकांनी कॅम्पिंगचे आयोजन केले आहे. अशा प्रत्येक समूहात ५० ते १०० जणांचा समावेश आहे.

काही वर्षांपासून भंडारदरा, साम्रद या ठिकाणची गर्दीही वाढत असून मागील वर्षी नाताळ आणि वर्षअखेरीस पाच हजार पर्यटक दाखल झाले होते. यावर्षी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे साम्रद येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.

माहुली, हरिश्चंद्रगडावर मद्य मेजवान्यांना प्रतिबंध

  • कॅम्पिंगबरोबरच शहरानजीकच्या गडकिल्ल्यांवर जाऊन वर्षअखेर साजरी करणाऱ्यांची गर्दी वाढू लागल्यापासून किल्ल्यांवरील मद्य मेजवान्यांना प्रतिबंध करण्यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील आहेत.
  • शहापूरनजीकच्या माहुली किल्ल्यावर जाण्यास वर्षअखेरच्या शेवटच्या दोन दिवसांत प्रतिबंध करण्यात आला आहे. माहुलीच्या पायथ्याशी असलेल्या गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वन खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • हरिश्चंद्र गडावरही पर्यटकांना या काळात जाण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय पाचनई येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
  • पुणे जिल्ह्य़ातील वन खात्याच्या हद्दीतील किल्ल्यांवर असा प्रकार होऊ नये यासाठी वनविभागातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत.
  • पनवेलनजीकच्या प्रबळगडावर प्रचंड गर्दी होत असल्याने शासकीय यंत्रणांनीच येथे सुरक्षा पुरवावी, अमली पदार्थ प्रतिबंधक कारवाई करावी, अशी मागणी पनवेलमधील शिव सह्य़ाद्री संस्थेने केली आहे.