डोंबिवली-दिव्यादरम्यान गाडीतून पडून तरुणाचा मृत्यू

उपनगरीय रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे डोंबिवली आणि दिवा स्थानकांदरम्यान शुक्रवारी लोकलच्या दरवाजात कसाबसा उभा असलेला एक तरुण पडून त्याचा मृत्यू झाला. उपनगरीय रेल्वेगाडय़ांमधील वाढती गर्दी आणि रेल्वेगाडय़ांची अपुरी संख्या यामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण होणे, हाच या समस्येवरील उपाय असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे.
डोंबिवली येथे राहणाऱ्या भावेश नकाते या २१ वर्षीय तरुणाने शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास डोंबिवलीहून मुंबईकडे जाण्यासाठी जलद गाडी पकडली. मात्र, गर्दीने खच्चून भरलेल्या या गाडीत शिरणे त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे तो दरवाजात लटकत राहिला. पण वेगात असलेली गाडी कोपर आणि दिवा स्थानकांमध्ये असताना या तरुणाचा हात सुटला आणि तो धावत्या लोकलमधून पडला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत भावेशला शास्त्रीनगर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

गाडय़ांच्या फेऱ्यांची संख्या सध्या वाढवणे शक्य नाही. सध्या उपलब्ध असलेल्या चार मार्गिकांवरून उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांचीही वाहतूक होते. परिणामी जादा गाडय़ा उपलब्ध होऊनही फेऱ्यांची संख्या वाढवणे कठीण आहे. – रेल्वे प्रशासन