गेल्या काही वर्षांत पर्यटकांचा ओढा क्रूझ पर्यटनाकडे चांगलाच वाढला असून चार वर्षांत त्यामध्ये दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे शुक्रवारी कोस्टा क्रूझ लाईन्सची क्रूझ दाखल झाल्यानिमित्त आयोजित  कार्यक्रमात मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष संजय भाटिया यांनी क्रूझ पर्यटनास चांगलीच चालना मिळत असल्याचे अधोरेखित केले.

जलपर्यटनाला केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे चालना मिळत असून क्रूझची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. गेल्या चार वर्षांत  देशातील महत्त्वाच्या बंदरांवरील २०१५-१६ मधील एकूण क्रूझ फेऱ्यांची संख्या १२८ होती, ती २०१८-१९ मध्ये २८५ वर पोहचली. तर पर्यटकांची संख्या एक लाख २५ हजार ८३८ वरून दोन लाख ५७ हजार ६७० इतकी झाली आहे. देशाच्या किनारपट्टीवरील  चेन्नई, कोचीन, मुंबई, नवीन मंगलोर आणि गोवा ही पाच महत्त्वाची बंदरे क्रूझ पर्यटनामध्ये सक्रिय आहेत. यामध्ये मुंबईचा क्रमांक सर्वात वरचा आहे. मुंबई बंदरावर २०१७-१८ या वर्षांत १०६ क्रूझच्या सफरी निघाल्या होत्या. येथून ८६ हजार ७५७ पर्यटकांनी क्रूझ पर्यटनाचा आनंद घेतला. त्याखालोखाल गोवा बंदराचा क्रमांक असून वर्षभरात तेथे ९९ क्रूझ दाखल झाल्या. शुक्रवारी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी यासंदर्भात केलेल्या सादरीकरणात ही माहिती दिली.

या प्रसंगी जलवाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले भारतातील क्रूझ पर्यटनाची बाजारपेठ मोठय़ा प्रमाणात वाढत असून देशाच्या आर्थिक विकासात क्रूझ पर्यटन मोलाची भूमिका बजावत आहे.’ याप्रसंगी त्यांनी क्रूझ पर्यटनातील समस्या मांडून त्याचे निराकरण करण्याबाबत उपाययोजना केल्या जातील असे नमूद केले.

केंद्र सरकारकडून क्रूझ पर्यटनास चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. भविष्यात क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने रोड मॅप तयार केला आहे. तसेच बंदरात येणाऱ्या क्रूझना थांबा घेण्यासाठी असलेल्या शुल्कामध्ये २० टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच सात बंदरांवर पायाभूत सुविधांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे.

भविष्यात ब्रह्मपुत्रा आणि गंगा नद्यांचा विचारदेखील क्रूझ पर्यटनासाठी विचार होणार असल्याचे यावेळी भाटीया यांनी सादरीकरणात सांगितले. तारकर्ली, मुरुड, जंजिरा आणि गणपतीमुळे या ठिकाणांचा विकास करण्याचा प्रस्तावदेखील यामध्ये अंतर्भूत असून, मुंबईत नवीन टर्मिनलची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  या कार्यक्रमास कोस्टा क्रूझ इंडियाच्या प्रतिनिधी नलिनी गुप्ता उपस्थित होत्या.

२०१९-२०२० या वर्षांत क्रूझची संख्या ५९३ वर, तर पर्यटकांची संख्या चार लाख १८ हजार ४०० होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून क्रूझ पर्यटनासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली जात आहेत, यामुळे परदेशातील क्रूझ लाईन कंपन्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत आहेत.  क्रूझ व्यवसायामुळे देशामध्ये पर्यटनातील रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.        – संजय भाटिया, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष