मुंबई: चार जणांचा बळी घेणारी परळ येथील क्रिस्टल टॉवरमधील आग शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचा निष्कर्ष अग्निशमन दलाच्या अहवालात काढण्यात आला आहे. त्याच वेळी या इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले.

परळ येथील क्रिस्टल टॉवर इमारतीमध्ये २२ ऑगस्ट रोजी सकाळी आग लागली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले.अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने तीन तासांच्या प्रयत्नांनंतर २१ जखमींना बाहेर काढले.  ही आग शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचे अग्निशमन दलाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित इमारतीने अग्निप्रतिबंधक यंत्रणेसंबंधी ना-हरकत प्रमाणपत्र घेतले नव्हते. या इमारतीत अग्निशमन यंत्रे, सूचनाचिन्हे नव्हती त्याचप्रमाणे पायऱ्या तसेच वाहनतळावर भंगार सामान साठवण्यात आले होते, विद्युतवाहिन्या योग्य पद्धतीने सीलबंद करण्यात आल्या नव्हत्या अशी निरीक्षणेही या अहवालात नोंदवण्यात आली आहेत. अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत या इमारतीला निवासी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.