स्वच्छ आणि सुंदर स्थळांच्या स्पध्रेतून बाद

सुशोभीकरणाकरिता जर्मन काचा आणि पदपथावरील इटालियन दिवे येण्यास विलंब झाल्याने मुंबई महापालिकेने मोठय़ा झोकात सुरू केलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरा’चे (सीएसएमटी) सुशोभीकरण रखडले आहे. या दिरंगाईची किंमत ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत घेतल्या गेलेल्या स्पर्धेमध्ये आपली आघाडी चुकवून सोसावी लागली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळविणाऱ्या आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून बिरुद मिरविणारी मुंबई केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत आयोजित स्वच्छ आणि सुंदर स्थळांच्या स्पर्धेत बाद ठरली आहे. या स्पर्धेकरिता या परिसराच्या सुशोभीकरणाची तयारी पालिकेने मोठय़ा झोकात केली होती. मात्र स्पर्धा कालावधीत ही कामेच पूर्णच होऊ शकलेली नाहीत. पालिकेच्या आराखडय़ातील गॅलरी वगळता सर्व कामे रखडली आहे. पादचारी भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण अर्धवट अवस्थेत आहे. रस्ते-पदपथांची दुरुस्ती व त्यांच्यातील एकसमानता, इमारतींची एकसमान रंगसंगती, सीएसएमटी परिसरात आकर्षक पददिवे बसवणे, उद्यानाचे सुशोभीकरण, बस आगराचे स्थलांतर, पदपथ फेरीवालामुक्त  करणे आदी कामे रखडली आहेत. यापैकी बहुतांश कामे मंजुरीच्या पातळीवरच रखडली आहेत. एखादे नागरी काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर संबंधित स्थळाची पाहणी करून त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येते. निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदार निश्चित केला जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी तो स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जातो. प्रस्तावावर साधकबाधक चर्चा केल्यानंतर स्थायी समिती सदस्यांकडून मंजुरी मिळते आणि त्यानंतर काही दिवसांनी कंत्राटदाराच्या हाती कार्यादेश पडतो. कार्यादेश मिळाल्यानंतर कंत्राटदार काम सुरू करतो. अशी पालिकेच्या कामांची कार्यपद्धत आहे. या दीर्घकाळ चालणाऱ्या प्रक्रियामुळे स्वच्छ आणि सुंदर स्थळाच्या स्पर्धेत सहभागी असलेल्या सीएसएमटी परिसरातील कामे रखडली आहेत. स्पर्धेचा कालावधी कमी असल्यामुळे ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याची गरज होती. मात्र आजही काही कामांना स्थायी समितीची मंजुरी मिळू शकलेली नाही.

या सुशोभीकरणात मोठा अडथळा ठरले ते फेरीवाले. या परिसरात सुधारण १६ ते २० अधिकृत फेरीवाले आहेत. त्यांच्या आड अनेक अनधिकृत फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. टर्मिनस परिसराच्या सुशोभीकरणामध्ये या फेरीवाल्याचे स्थलांतर करणे गरजेचे होते. येथील काही स्टॉल्स महात्मा गांधी मार्गावर, तर उर्वरित फेरीवाल्यांचे जवळच स्थलांतर करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न निर्माण झाला आणि या स्थलांतराला खो बसला.स्वच्छ आणि सुंदर स्थळांच्या स्पर्धेत मदुराईमधील मीनाक्षी मंदिर परिसराने पहिला क्रमांक पटकावला. कामांच्या मंजुरीला झालेली दिरंगाई आणि प्रत्यक्ष कामात निर्माण झालेले अडथळे यामुळे देश-विदेशात महत्त्वाचे स्थान मिळवणाऱ्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराला आघाडीचे स्थान मिळविण्याची संधी हुकली. गेल्या वर्षी स्वच्छतेमध्ये मुंबईचा क्रमांक घसरला. आता या स्पर्धेत पराभव पत्करावा लागला.

सीएसएमटी परिसराच्या सुशोभीकरणातील सर्व प्रकल्प कामे होती. या कामांसाठी निविदा मागविणे, मंजुरी घेणे आदींसाठी बराच वेळ गेला. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करताना तेथे जर्मनीच्या काचा बसवण्यात आल्या आहेत. या काचा मुंबईत पोहोचण्यास विलंब झाला, तसेच पथदिवे बदलण्यात येणार असून त्यासाठी इटलीहून पथदिव्यासाठी आकर्षक खांब मागविण्यात आले आहेत. अशा अनेक कारणांमुळे ही कामे रखडली. ही कामे वेळेत पूर्ण झाली असती तर नक्कीच ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरा’ला आघाडीचे स्थान मिळाले असते.

किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘विभाग कार्यालय