मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळला असून या दुर्घटनेत घाटकोपरमध्ये राहणाऱ्या जाहीद सिराज खान (वय ३२) याचा देखील मृत्यू झाला आहे. जाहीदचा बेल्ट विक्रीचा व्यवसाय असून व्यवसायासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी तो वडिलांसोबत क्रॉफर्ड मार्केट परिसरात गेला होता.

नित्यानंद नगर येथे राहणाऱ्या जाहीद सिराज खान याचा घाटकोपर स्टेशन परिसरात बेल्ट विक्रीचा व्यवसाय होता. जाहीद आणि त्याचे वडील सिराज खान हे दोघे व्यवसायासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी क्रॉफर्ड मार्केट परिसरात गेले होते. तिथून परतत असताना पादचारी पूल कोसळला आणि जाहीद पुलासोबत खाली कोसळला. तर सिराज यांच्या हाताला दुखापत झाली. या दुर्घटनेत जाहीदचा मृत्यू झाला. तर सिराज हे जखमी झाले आहे.. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्लाह ने मेरे बेटे को उठा लिया, असे सांगताना सिराज रडू आवरता आले नाही. जाहीदला दोन मुलं देखील होती.

दरम्यान, पूल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५) आणि मोहन कायगडे (५५) यांचा देखील मृत्यू झाला आहे.