मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळून मृत्यू झालेल्यांमध्ये तीन परिचारिकांचा समावेश आहे. अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (वय ४०) आणि भक्ती शिंदे (वय ३२) अशी त्यांचे नावे आहेत. अपूर्वा आणि रंजना या दोघी डोंबिवलीतील रहिवासी असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रभू (वय ३५), रंजना तांबे (वय ४०) आणि भक्ती शिंदे (वय ३५) या तिघींचा समावेश आहे. त्या तिघीही जी. टी. रुग्णालयातील परिचारिका होत्या.

भक्ती शिंदे या कामावरुन घरी परतत होत्या. तर अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या रात्रपाळीसाठी रुग्णालयात जात होत्या. अपूर्वा प्रभू या ओटी विभागात कामाला होत्या, तर रंजना तांबे या ऑर्थो विभागात कामाला होत्या. त्या तिघीही डोंबिवलीच्या रहिवासी असल्याचे समजते. अपूर्वा प्रभू या डोंबिवलीतील ठाकूरवाडी परिसरातील रहिवासी असून त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांचा मोठा मुलगा सातवीत शिकतो. रंजना तांबे या डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर परिसरात राहत होत्या. तर भक्ती शिंदे या देखील डोंबिवलीच्या रहिवासी असल्याचे समजते. पण त्याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.