छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारत आणि अंजूमन इस्लाम शाळेजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर  एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण पुलासाठी सरकारकडे पैसे नाहीत, लोकांच्या सुरक्षेचे काय ?, असा संतप्त सवाल आमदार वारिस पठाण यांनी विचारला आहे.

गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. यात १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील पादचारी पुलांची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. यावरुन एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयावर टीका केली.

बऱ्याचदा सांगूनही या पुलाचे ऑडिट झालेलं नाही, हजारो लोक इथून दररोज प्रवास करतात, आता या पुलावरुन एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रकार होईल, बीएमसी आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतील, असे वारिस पठाण यांनी सांगितले. सरकारने या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारकडे स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यासाठी पैसे आहेत, पण पुलासाठी पैसे नाही, असे त्यांनी सांगितले.