18 October 2019

News Flash

बेपर्वाईचे बळी.. ‘सीएसएमटी’स्थानकाला जोडणारा पूल कोसळून ६ मृत्युमुखी, ३० जखमी

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३० जण जखमी झाले.

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेमुळे बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहाणाऱ्या मुंबईसमोरील पायाभूत सुविधांच्या खचत चाललेल्या पायाचे भीषण वास्तव समोर आले आहे.

नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याच वेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. सायंकाळी दादाभाई नौरोजी मार्ग गर्दीने फुलून जातो. या मार्गावरील बी. टी. लेन येथून टर्मिनसमध्ये जाणारा हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्य़ांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.

पूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.  या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२)  आणि मोहन कायगडे (५५)  या सहा जणांचा मृत्यू झाला. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयातील परिचारिका आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये सोनाली नवले (वय ३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख यांचा समावेश आहे.

ही दुर्घटना घडल्यानंतर या परिसरात बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात निवडणुकीच्या तोंडावर ही दुर्घटना झाल्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही धाव घेतली. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला होता आणि मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. पालिकेने रस्त्यावर कोसळलेल्या पुलाचे अवशेष तातडीने हलवून रस्ता मोकळा केला. तसेच पुलाचा धोकादायक बनलेला स्लॅब पाडण्याचे कामही तातडीने हाती घेण्यात आले. त्यामुळे दादाभाई नवरोजी मार्गावरील वाहतूक बंदच ठेवण्यात आली होती.

या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून जखमींना त्वरित योग्य ते उपचार मिळण्याची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

चौकशीचा आदेश

मुंबईतील सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आली होती. त्या तपासणीत हा पूल चांगला असल्याचा आणि किरकोळ डागडुजीची शिफारस करणारा अहवाल देण्यात आला होता. तरीही हा पूल पडल्याने दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर संरचनात्मक तपासणीत कसूर झाली असल्यास दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

वाहतूक आजही रखडणार?

दुर्घटना स्थळाची शुक्रवारी पाहणी करून दादाभाई नौरोजी मार्गावरील वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू होईपर्यंत सीएसएमटीकडे येणारी आणि तेथून उपनगरांकडे जाणारी वाहतूक मेट्रो चौकातून वळविण्यात आली आहे, असे सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी सांगितले.

जबाबदारी कोणाची?

पूल कोसळून जीवितहानी ओढवताच पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची, हा वाद रंगला. रेल्वेने तातडीने या पुलाची जबाबदारी झटकून टाकली. या दुर्घटनेनंतर ट्विटरवरून महापालिका, सरकार आणि रेल्वेवर जोरदार ट्विपण्णी सुरू झाली.

मृतांच्या आप्तांना पाच लाख

पूल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.

First Published on March 15, 2019 2:20 am

Web Title: csmt fob collapse several pedestrains dead injured railway bmc