छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असला तरी या दुर्घटनेत सीएसएमटीसमोरच्या रस्त्यावरील सिग्नलमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी सिग्नल लागल्याने पुलाखालील रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील अंजूमन इस्लाम शाळेजवळील पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून 36 जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. संध्याकाळी साडे सातची वेळ असल्याने पादचारी पुलावरील गर्दी थोडी कमी झाली होती.

या पुलाखालून जे जे फ्लायओव्हरकडे रस्ता जातो. या रस्त्यावर संध्याकाळी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दुर्घटना घडली त्यावेळी या पुलाखालून एक टॅक्सीचालक त्याची गाडी घेऊन जात होता. सुदैवाने पुलाचा स्लॅब त्याच्या टॅक्सीच्या समोरील भागावर कोसळला आणि टॅक्सीचालक बचावला. या टॅक्सीचालकाने आणि आणखी एका प्रत्यक्षदर्शीने वृत्तवाहिन्यांना दिलेल्या माहितीनुसार, हा पुलाचा स्लॅब कोसळला त्यावेळी सीएसएमटीसमोरील मुख्य रस्त्यावर सिग्नल लागला होता. यामुळे पुलाखाली वाहनांची संख्या कमी होती, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. पूल कोसळण्यापूर्वी आवाज आला आणि अवघ्या काही क्षणातच तो पूल कोसळला, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

एका प्रत्यक्षदर्शीने संतापही व्यक्त केला. मी दररोज या पुलावरुन महाविद्यालयात जातो, एकीकडे बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प राबवण्याची घोषणा केली जाते. दुसरीकडे पादचारी पुलासारख्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होते, अशी खंत त्या तरुणाने व्यक्त केली.