छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान रेल्वे वाहतुकीसाठी चार महिन्यांत अहवाल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल उन्नत जलद मार्ग प्रकल्पाचा फेरआढावा घेण्यासाठी सल्लागाराची निवड करण्यात आली असून येत्या चार महिन्यांत यासंबंधी अहवाल मिळेल, अशी माहिती ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ने (एमआरव्हीसी) दिली.

नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एमयूटीपी-३ ए’मधील (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट) प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. परंतु ५४ हजार कोटी रुपयांऐवजी ३३ हजार ६९० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली. यातून सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, पनवेल ते विरार नवीन मार्ग प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या सूचना मंत्रिमंडळाने एमआरव्हीसीला केल्या. गेली दहा वर्षे सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गाची नुसतीच चर्चा झाली. त्यामुळे मंत्रिमंडळाने आढावा घेण्याच्या सूचना दिल्याने प्रकल्प बाजूला सारला गेला.

एमआरव्हीसीकडून उन्नत मार्गाचा आढावा घेतला जाणार आहे. याआधी रेल्वेच्या राइट्सने सल्लागार म्हणून प्रकल्पाचे काम पाहिले होते. आता पुनर्आढावा घेण्यासाठी याच कंपनीची नियुक्ती करणार की निविदा काढायची याचा विचार केला जात आहे. रेल्वे बोर्डाकडून आढावा घेण्याच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा एमआरव्हीसी करत आहे.

त्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल.

सीएसएमटी ते पनवेल सध्याच्या प्रवासासाठी ७५ मिनिटे लागतात. उन्नत मार्गामुळे हाच प्रवास २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार होता. परंतु सध्या मेट्रो, मोनो रेल्वेचे सुरू असलेले प्रकल्प व भविष्यात होणारे प्रकल्प, तसेच ट्रान्स हार्बर लिंक रोड इत्यादीमुळे उन्नत मार्ग कितपत फायदेशीर होऊ शकतो याचा आढावा घेण्याच्या सूचना आहेत.

त्यानुसार आढावाचे काम केले जाणार आहे. यासंदर्भात एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना यांनी पुनर्आढावा घेण्यासाठी चार महिने लागतील, अशी माहिती दिली.

‘कागदोपत्री प्रक्रियेची प्रतीक्षा’

आढावासाठी सल्लागार नियुक्त केला जाईल. यापूर्वी ‘राइट्स’ने सल्लागार म्हणून काम केले होते. आता नवीन सल्लागाराची नियुक्ती की राइट्सची त्याबाबत निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. उन्नत मार्ग प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र मंत्रिमंडळाने केलेल्या अहवालानुसार त्याची योग्यता तपासली जाणार आहे. सध्या रेल्वे बोर्डाकडून होणाऱ्या कागदोपत्री प्रक्रियेची आम्ही वाट पाहात आहोत, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना यांनी सांगितले.