|| सुशांत मोरे 

मुंबई : विमान सेवेप्रमाणे सुविधा असलेली सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस मुंबई सेन्ट्रल ते अहमदाबाद मार्गानंतर आता महाराष्ट्रअंतर्गत सीएसएमटी ते शिर्डी व्हाया पुणे मार्गावरही धावणार आहे. एप्रिल किंवा मे २०२० पासून शिर्डीसाठी तेजस एक्स्प्रेस चालवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती ‘इंडियन रेल्वे कॅटिरग  अ‍ॅण्ड टूरिझम कॉपरेरेशन’कडून (आयआरसीटीसी) देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव सध्या रेल्वे बोर्डाकडे आहे.

मुंबई ते अहमदाबाद धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर लवकरच प्रवाशांसाठी मसाज खुर्ची, मिनी चित्रपटगृह उपलब्ध केले जाणार आहे. मिनी चित्रपटगृहासाठी एक स्वतंत्र डबाच बसवण्यात येईल, अशी माहिती आयआरसीटीसीने दिली. भविष्यात याच सुविधा शिर्डी तेजसमध्येही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

दिल्ली ते लखनौ, मुंबई ते अहमदाबाद मार्गावर आयआरसीटीसीने १८ जानेवारीला तेजस एक्स्प्रेस सुरू केली. त्यामुळे हा प्रवास सुपरफास्ट झाला आहे. या एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ७३५ प्रवासी क्षमता असलेली ही गाडी गेल्या दोन दिवसात हाऊसफुल्ल होत आहे. प्रवाशांनी केलेल्या सूचनांनुसार खाद्यपदार्थाचा दर्जा सुधारण्याबरोबरच अन्य काही बदल सुरू केल्याची माहिती आयआरसीटीसीचे ग्रुप महाव्यवस्थापक राहुल हिमालियन यांनी दिली. प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता तेजस एक्स्प्रेसमध्ये मसाज खुर्ची, मिनी चित्रपटगृहाची सुविधाही उपलब्ध केली जाणार असल्याचे हिमालियन यांनी सांगितले.

तेजसच्या शेवटच्या आसनांमध्ये काही बदल करून तेथे यांत्रिक मसाज खुर्ची बसवण्यात येईल. यात हात, पायांचा मसाज होईल. यासाठी साधारणपणे ५० ते १०० रुपये शुल्क आकारण्याचा आयआरसीटीसीचा विचार आहे. याशिवाय सहा तासांच्या प्रवासात विरंगुळ्यासाठी मिनी चित्रपटगृह उभारण्याची कल्पना आहे. यासाठी दहा डब्यांच्या तेजसला आणखी एक डबा जोडला जाईल. हा संपूर्ण डबा मिनी चित्रपटगृह म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती हिमालियन यांनी दिली.

सीएसएमटी ते शिर्डी व्हाया पुणे अशी आणखी एक तेजस एक्स्प्रेस एप्रिल किंवा मे २०२० पर्यंत चालवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ही एक्स्प्रेस प्रतितास १३० किमी वेगाने धावेल. सीएसएमटीहून पुण्याला जाणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या आधी शिर्डीसाठी तेजस सोडण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे असून लवकरच त्यावर निर्णय होणार असल्याचे म्हणाले. शिर्डीसाठी तेजस एक्स्प्रेस सुरू झाल्यास त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच मसाज, मिनी चित्रपटगृहाची सुविधाही मिळणार आहे.

तेजस हाऊसफुल्ल

मुंबई ते अहमदाबाद तेजसची प्रवासी क्षमता ७३५ आहे. परंतु प्रत्येक फेरीतून त्यापेक्षाही जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. पुढील स्थानकात प्रवासी उतरल्यानंतर तेवढेच प्रवासी तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करतात. २० जानेवारीला मुंबईतून जाताना ७८६ प्रवासी, अहमदाबादमधून मुंबईला येताना ८६० प्रवासी मिळाले. १९ जानेवारीलाही असाच प्रतिसाद मिळाला होता.