मुंबईच्या सर्वागीण विकासाची साक्षीदार असलेली छत्रपती शिवाजी टर्मिनसची वारसा हक्क असलेली वास्तू शुक्रवारी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. सोमवार ते शुक्रवार दुपारी तीन ते पाच या वेळेत या वास्तूमधील काही विशेष भाग पर्यटकांना पाहण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे ही वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्यांना विनाशुल्क छायाचित्र काढण्याची, तसेच व्हीडीओ चित्रीकरणा करण्याची परवानगी रेल्वेने दिली आहे.
रेल्वेच्या मालकीच्या असलेल्या ब्रिटिशकालीन गॉथिक शैलीतील या वास्तूच्या विशेष फेरफटक्यासाठी विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये तर अन्य पर्यटकांसाठी २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत. या फेरीसाठी भाटिया बागेजवळील बस आगाराच्या बाजूस असलेल्या रेल्वेच्या इमारतीत तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी या वारसा हक्क वास्तूच्या गॅलरीचे उदघाटन शुक्रवारी केले. दिवसाला किमान १०० पर्यटक या वास्तूला भेट देतील, असे सांगून ते म्हणाले की, प्रत्येक १० पर्यटकांच्या गटासोबत एक मार्गदर्शक असेल. जे जे स्कूल ऑफ वास्तूरचनाशास्त्राचे विद्यार्थी तसेच राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे काही कर्मचारी यांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे. पर्यटक छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या वास्तूचे बाहेरून छायाचित्र कोढत असतात. मात्र ही वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्यांना छायाचित्र तसेच व्हीडीओ चित्रण करण्यासाठी संधी मिळणार आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार नाही.
या ऐतिहासिक वारसा हक्क वास्तूमध्ये लवकरच विशेष प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाबरोबर चर्चा सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. या रोषणाई कामाची निविदा प्रक्रिया सध्या सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.    
पिझ्झापेक्षा वास्तू पाहण्याचे दर स्वस्त
छत्रपती शिवाजी टर्मिनसची वास्तू पाहण्यासाठी आकारण्यात आलेले दर जास्त असल्याबाबत विचारले असता महाव्यवस्थापक जैन म्हणाले की, ही सार्वजनिक वास्तू नाही. रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या पिझ्झा केंद्रामध्ये मिळणारा पिझ्झा हा महाग असूनही तो खाण्यासाठी गर्दी होते. त्यामानाने हे तिकीट फारच स्वस्त आहे. यातून आम्हाला आर्थिक लाभ मिळवायचा नाही.