छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी सकाळी मडगांवला जाणारी गाडी तब्बल तीन तास उशिराने सुटल्याने प्रवाशांना मोठया मनस्तापाला सामोरे जावे लागले. होळीनिमित्त कोकणात जाणारे चाकरमानी मुलाबाळांसह दादर, ठाणेसह अन्य स्थानकात ताटकळत राहिले. कोकणातूनच ही गाडी मुंबईच्या दिशेने पोहोचण्यास उशीर झाल्याची माहीती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. सकाळी दहा वाजताही ही गाडी सीएसटी स्थानकामध्येच उभी असल्याने अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डाउनला जाणारी गाडी क्रमांक ०१११३ मडगांव फेस्टिवल विशेष गाडी सकाळी सव्वा सातच्या सुमारास सीएसएमटीमधून सुटते. ही गाडी ठाण्याला सकाळी पावणे आठ वाजता पोहोचते. परंतु शुक्रवारी ही गाडी वेळेत सुटलीच नाही. त्यामुळे सीएसएमटीसह दादर, ठाणे, पनवेल येथे गाडीची वाट पाहणारे प्रवासी ताटकळत राहिले. गाडी सीएसएमटीतुन अद्याप सुटली नसून त्याची माहीती प्रवाशांना देण्यात येईल अशी उद्घोषणा काही स्थानकात होत होती. परंतु गाडी न सुटण्याचे नेमके कारण सांगितले जातं नव्हते. त्यातच गाडी सुटण्याचा आधी ती उशिराने असल्याचा संदेशही प्रवाशांच्या मोबाईलवर न आल्याने प्रवासी गाडीच्या वेळेनुसारच स्थानकात दाखल झाले होते.

दादर, ठाणे स्थानकातुन मोठया संख्येने गाडी पकडणाऱ्या प्रवाशांकडून संतापही व्यक्त होत होता. होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी निघालेले लहान मुले, ज्येष्ठ नागरिक सामानासह स्थानकात बराच वेळ बसून होते. गाडी उशिराने असल्याने काही प्रवासी डुलक्याही घेत होते. सकाळी गाडी उशिराने असल्याची होणारी उद्घोषणाही नंतर बंद झाली. परिणामी प्रवाशांना गाडी रवाना होणार की नाही, रद्द तर झाली नाहीना याची चिंता लागून राहिली होती. मडगांवला जाणारी ही गाडी महिन्यातून बऱ्याच वेळा उशिरानेच असते अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत होती.

मध्य रेल्वेकडे याबाबत विचारणा केली असता कोकणातूनच गाडी उशिराने मुंबईत दाखल झाली असून त्याचे कारण मात्र सांगण्यात आले नाही.