छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथील लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठीच्या प्रवासी आरक्षण केंद्रात बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. हे केंद्र आठ वाजता बंद होत असल्याने सुदैवाने प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती.
ही आग विझविण्यासाठी पुढे सरकलेल्या दोन आरपीएफ जवानांना या आगीची झळ लागली आणि त्यांना तातडीने सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर तातडीने हे केंद्र बंद करण्यात आले.
त्यानंतर अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या अग्निनाटय़ाचा फटका प्रवाशांना फारसा बसला नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले. या केंद्रातील वीज प्रवाहाची तपासणी केल्यानंतरच गुरुवारी सकाळी हे आरक्षण केंद्र प्रवाशांसाठी खुले करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 5:27 am