28 October 2020

News Flash

‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत!

करोनाग्रस्त रुग्णांना राज्य सरकारचा दिलासा

करोनाग्रस्त रुग्णांना राज्य सरकारचा दिलासा

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : करोना रुग्णांकरिता राज्य सरकारने सीटी स्कॅनच्या दरांवर नियंत्रण आणले आहे. यापुढे सीटी स्कॅनसाठी दोन ते तीन हजार रुपयांहून अधिक शुल्क आकारता येणार नाहीत, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. दररोज २० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. यातील बहुतेक रुग्णांना छातीतील संसर्ग व न्युमोनियासाठी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. सीटी स्कॅनसाठी रुग्णांना किमान साडेतीन ते सात हजार रुपये मोजावे लागतात. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच रुग्णांचेही अनेक आक्षेप होते. ही बाब लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीत शीव रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. अनघा जोशी, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे आणि जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांचा समावेश होता.

सीटी स्कॅन सुविधा असलेली रुग्णालये आणि केंद्रांबरोबर डॉ. शिंदे यांच्या समितीने सखोल चर्चा केली होती. त्यानंतर सीटी स्कॅनसाठीचे दर निश्चित करण्यात आले.

नवे दर असे.. : डॉ. शिंदे यांच्या समितीने १६ ‘स्लाइस सीटी स्कॅन’साठी दोन हजार रुपये, १६ ते ६४ ‘स्लाइस’ क्षमतेच्या मशीनद्वारे केलेल्या सीटी स्कॅनसाठी अडीच हजार रुपये, तर ६४ ‘स्लाइस’साठी तीन हजार रुपये दर निश्चित केला आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 2:48 am

Web Title: ct scan cost rs 2000 in maharashtra zws 70
Next Stories
1 वर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती
2 मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई!
3 प्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी
Just Now!
X