किनारपट्टीवरील सात बंदरांच्या अभ्यासातून निष्कर्ष

मुंबई : किनारपट्टीवरील सात बंदरांवर शार्क माशांची पिल्ले पकडण्याचे प्रमाण अधिक असल्याची बाब उघडकीस आली आहे. कांदळवन कक्षाअंतर्गत, कांदळवन प्रतिष्ठानने (मॅनग्रोव्ह फाऊंडेशन) सात महिन्यांसाठी केलेल्या या प्राथमिक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे, परिणामी शार्कची मासेमारी नियंत्रित करण्याची गरज अधोरेखित होते.

कांदळवन प्रतिष्ठानतर्फे सातपाटी, ससून डॉक, माझगाव, वर्सोवा, अलिबाग, हर्णे आणि मालवण या सात ठिकाणी एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० मध्ये हा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास जरी प्राथमिक स्वरूपाचा असला तरी त्यातून शार्क माशांच्या पिल्लांच्या मासेमारीचा मुद्दा पुढे आला आहे.

अभ्यासादरम्यान हर्णे, ससून डॉक, माझगाव, मालवण बंदरांवर ब्लॅक टीप शार्क आणि हॅमरहेड शार्कची पिल्ले दिसून आली. एकूण ३१ प्रजातींचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. त्यापैकी १८ प्रजातींची शार्कची पिल्ले विविध बंदरांवर आढळली. जन्माला आलेल्या शार्क माशांच्या सुमारे ५० टक्के  पिल्लांचाच प्रवास प्रौढ शार्कपर्यंत विकसित होतो.

त्यामुळे या पिल्लांची अशीच मासेमारी होत राहिली, तर भविष्यात या प्रजातींची पैदास मंदावण्याची भीती या अहवालामुळे अधोरेखित होते.

शार्कसंदर्भात आपल्याकडे अनेक स्तरांवर छोटेमोठे अभ्यास झाले आहेत, मात्र त्याच जोडीने पिल्लांच्या अभ्यासाला अधिक चालना मिळण्याची गरज यानिमित्ताने पुढे येतो. हा प्राथमिक अभ्यास कांदळवन प्रतिष्ठानच्या सागरी जीवशास्त्रज्ञ धनश्री बगाडे यांनी केला आहे.

बहुतांश शार्क प्रजातींचा ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ संस्थेच्या (आयूसीएन) वर्गवारीनुसार संवर्धनाबाबतीत धोकादायक पातळीवरील गटात समावेश होतो. ही संस्था संयुक्त राष्ट्रांतर्गत कार्यरत आहे. या यादीनुसार शार्कच्या संवर्धनासाठी सर्वाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र सध्या तरी याबाबत आपल्याकडे फारसा उत्साह दिसत नाही.  मुख्यत: मोठय़ा यांत्रिक बोटींनी होणाऱ्या अनियंत्रित मासेमारीमुळे हा फटका बसत असल्याची माहिती अनेक मच्छीमार संघटनांनी दिली. एकाच वेळी मोठय़ा जाळ्यात असे मासे पकडले जातात, त्यामुळे शार्कची पिल्लेदेखील यामध्ये अडकल्याची उदाहरणे दिसून आल्याचे संघटनांनी सांगितले. केंद्रीय मत्स्यपालन मंत्रालयाने मासेमारीसाठी ‘किमान कायदेशीर आकार’(मिनिमम लीगल साइझ) र्निबध लागू केले आहेत. राज्य पातळीवर सध्या हे नियम तयार झाले असून, लवकरच त्यासंदर्भात शासकीय प्रक्रिया पूर्ण करुन त्यांची अंमलबजावणी केली जाईल असे राज्याचे मत्स्य व्यवसाय सहआयुक्त राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

मत्स्यपरदेखील आढळले

या पाहणीदरम्यान मालवण आणि सातपाटी बंदरांवर काही प्रमाणात मत्स्यपरदेखील (शार्क फिन) आढळल्याची नोंद आहे. मत्स्यपरांचा पुढील व्यापार, प्रवास याबाबत मात्र अधिक माहिती मिळाली नाही. आयूसीएनच्या यादीचे संरक्षण लाभलेल्या काही प्रजातींच्या मत्सपरांचा यात समावेश आहे. अशा मत्स्यपरांचा साठा, विक्री, आयात-निर्यातीला पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीदेखील अशा घटना अधूनमधून घडत असतात.