समाजात विकृती वाढत असल्याने महिला सुरक्षित नसल्याची खंत व्यक्त करीत इंटरनेट, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व अन्य कार्यक्रम यांचा प्रभाव पडत असेल, तर त्यावरही बंधने आणण्याचा विचार करावा लागेल, असे प्रतिपादन महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. बलात्कार, विनयभंग आदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना अधिक प्रसिद्धी दिल्यास विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींना त्यातून प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे अशा घटनांना जास्त प्रसिद्धी देऊ नये, असा सल्लाही त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिला.

मुंडे यांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना महिलांवरील वाढत्या अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली. वडिलांकडूनच मुलीवर अत्याचार, १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याने तिला अपत्य होणे, भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार यांसारख्या अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघड झाल्या आहेत. अनेकांची महिलांकडे बघण्याची दृष्टी बदलली असून समाजात विकृती वाढत आहे. या वाढत्या घटनांवर कोणत्या उपाययोजना करायच्या, यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले. त्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आधीच्या सरकारच्या काळात या घटनांची नोंद करण्याचे प्रकार कमी होते. सरकारबद्दल विश्वास वाटत असल्याने आता हे गुन्हे नोंदले जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काटेकोर लक्ष असल्याने शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीतील बलात्काराच्या घटनेला खूपच प्रसिद्धी मिळाली. अशा घटनांना जास्त प्रसिद्धी देऊ नये, असेही त्या म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने मुलींना शाळेतच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात यावे, यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांना भेटून विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.