मराठीत विविध विषयांवरील चित्रपट येत असून हे चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यात लघू चित्रपटगृह उभारण्याचे उपक्रम राबवण्यासाठी सकारात्मक दृष्टीने पावले उचलणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. या वेळेस चित्रपट संमेलनासाठी आर्थिक मदत, महामंडळासाठी राज्य शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, मराठी चित्रपटांना देण्यात येणारे अनुदान गुणांकन पद्धतीने न करता पुन्हा दर्जा पद्धतीने करावे, कलाकारांना देण्यात येणारे निवृत्तिवेतन आणि चित्रपटांना मिळणारे अनुदान ऑनलाइन पद्धतीने करावे, या मागण्या चित्रपट महामंडळाकडून करण्यात आल्या. त्याचबरोबर पडद्यामागील कलाकारांना सांस्कृतिक कार्य विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा, नाटक, चित्रपट व वाचनालयाची सुविधा असलेले ‘नाटय़ चित्र सांस्कृतिक संकुल’ प्रत्येक जिल्ह्य़ात उभारण्यात यावे आणि मराठी सिनेमांना अधिक चित्रपटगृहे मिळावे, असे निवेदन अमित देशमुख यांना देण्यात आले. महामंडळाने दिलेल्या सर्व निवेदनाचा अभ्यास सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले. यावेळेस महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेत्री वर्षां उसगांवकर, किशोरी शहाणे- विज आणि दीपाली सय्यद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.