30 May 2020

News Flash

हुकूमशाहीतून संस्कृती विकसित होत नाही!

‘लोकसत्ता’ गप्पांमध्ये रत्ना पाठक-शाह यांची स्पष्टोक्ती

(संग्रहित छायाचित्र)

आपला समाज हा दोन्ही बाजूंनी होणाऱ्या चर्चेवर विश्वास ठेवत आला आहे. चर्चा हीच आपली संस्कृती आहे. मात्र आपण सध्या हुकूम देण्यावर विश्वास ठेवतो. मी सांगतो आहे ते करा. प्रश्न विचारू नका, अशा पद्धतीच्या हुकूमशाहीतून संस्कृती विकसित होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन करीत रत्ना पाठक-शाह यांनी समाज वर्तमानावर भाष्य केले.

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) आणि एम. के. घारे ज्वेलर्स सहप्रायोजित ‘लोकसत्ता गप्पा’ची ही अनोखी संवादमैफल रविवारी वरळी येथील नेहरू सेंटरच्या ‘हॉल ऑफ कल्चर’ या सभागृहात झाली. ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड हे या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर होते. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट के ली. रंगभूमीवर नट, लेखक-दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रयोगशील रंगकर्मी म्हणून कार्यरत असलेल्या मकरंद देशपांडे यांनी रत्ना पाठक-शाह यांच्याबरोबरचा हा संवाद खुलवला.

दोन रंगकर्मी एकत्र येतात तेव्हा साहजिक नाटक, नट, अभिनय या विषयांवरच्या गप्पांचा ओघ सुरू होतो. मात्र नाटकाच्या मांडणीतील प्रयोग असोत, नटाची शिस्त असो वा नट म्हणून आवाजावरच्या प्रभुत्वापासून नाटकाच्या निवडीपर्यंतची प्रक्रिया असो या विविध मुद्दय़ांना स्पर्श करत कधी गमतीने तर कधी ठामपणे व्यक्ती ते समष्टीपर्यंत या जडणघडणीचा प्रभाव कसा पडत जातो, याबद्दलची सविस्तर मांडणी रत्ना यांनी केली.

आज अभिनेत्री म्हणून आपण जे आहोत, त्याचे श्रेय ज्या पद्धतीच्या वैचारिक वातावरणात आपली जडणघडण झाली त्याला आहे असे सांगताना साठच्या दशकातील पिढी ही नवा भारत कसा असेल?, या विचारांतून साहित्य-नाटय़-चित्रपट कलेत नवनवे प्रयोग करत होती. त्या वेळी आपल्या घरात कम्युनिस्ट विचारांची आई, संघविचारांचा प्रभाव असलेले वडील अशी वेगवेगळ्या विचारधारांची मंडळी कशा पद्धतीने आपापसांत चर्चा करत होती, त्यांच्यात मतभेद होते पण एकमेकांना समजून घेत ते कसे एकत्र पुढे जात राहिले, याबद्दलच्या आठवणी त्यांनी उलगडल्या. खऱ्या अर्थाने मी विविधतेत एकता असलेल्या देशात वाढले, अशी भावना रत्ना यांनी व्यक्त केली. वैविध्यपूर्ण विचार, धर्म, तत्त्व असलेले, जपणारे लोक असले तरी सगळ्यांच्या मनात आपण हिंदुस्थानी आहोत, एकाच देशाचे नागरिक आहोत ही भावना असली पाहिजे. आम्ही कमळ आहोत, कमळ हजारो पाकळ्यांनी फुलते तसेच आम्ही फुलणार अशी उपमा देत अब्जावधी लोकसंख्या असलेला देश कोणी एकाने सांगितलेल्या पद्धतीनेच वागेल ही अपेक्षा चुकीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तब्बल दीड तास रंगलेल्या या अनुभवी संवादमैफलीत आजची घसरत चाललेली शिक्षण व्यवस्था, तरुण पिढीसमोरची सामाजिक-आर्थिक आव्हाने या मुद्दय़ांवरही त्यांनी आपले परखड विचार मांडले. नट म्हणून घडण्यासाठी कल्पनाशक्ती-निरीक्षणशक्ती कशी महत्त्वाची ठरते याचीही मांडणी रत्ना यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे केली. कलेचा साक्षात्कार ही अवघड गोष्ट आहे, तो होण्यासाठी कित्येक वर्षांची साधना अपुरी पडते, याची कबुली देतानाच त्यासाठी कलाकाराने सतत स्वत:ला घडवत राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

साठ-सत्तरच्या दशकांत नाटक-टेलिव्हिजन माध्यमांमध्ये केले गेलेले प्रयोग, तत्कालीन सामाजिक वातावरणाचा त्यावर असलेला प्रभाव इथपासून सुरू झालेल्या या गप्पांच्या प्रवासात नाटक-चित्रपटसृष्टीतील आपल्या अनुभवांच्या आधारे रत्ना यांनी आजच्या वास्तवावर नेमकेपणाने बोट ठेवले. आजूबाजूला ‘नकारी’ परिस्थिती असली तरी आपला देश इतका तरुण विचारांचा कधीच नव्हता, जो आज आहे. त्यामुळे हळूहळू का होईना विचारी तरुण पिढी बदल घडवेल, या सकारात्मक विचारांवर गप्पांचा समारोप त्यांनी केला.

आपले नाटय़शास्त्र आवडते..

साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या आपल्या इतिहासातही सुसंवाद प्रस्थापित करण्यावरच भर दिला आहे. विश्व हे अस्थिरच असणार, इथे वाद होणार, राग येणार हे मान्य केलेले आहे, मात्र या वादविवादातून, अस्थिरतेतून स्थिरता कशी निर्माण करायची हा आपला विचार असला पाहिजे, हेच आपल्या नाटय़शास्त्रातूनही मांडले गेले आहे. मी माझा विचार ऐकवते, तुम्ही तुमचा विचार मांडा. ही विचारांची देवाणघेवाण म्हणजेच आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच ग्रीक किंवा शेक्सपियर शैलीच्या नाटकांपेक्षाही सुसंवाद साधण्यावर भर देणारे आपले नाटय़शास्त्र जास्त आवडते, असेही रत्ना यांनी सांगितले.

नसिरुद्दीन यांच्या विधानाचा विपर्यास

नसिरुद्दीन शाह जेव्हा एखादे विधान करतात तेव्हा खूप विचारपूर्वक केलेले असते. आपण केलेल्या विधानावर ते शेवटपर्यंत ठाम असतात. देशातील परिस्थितीबद्दल भीती वाटते, असा त्यांच्या विधानाचा जाणूनबुजून विपर्यास करण्यात आला. आम्ही न घाबरता चुकीच्या गोष्टींबद्दल राग व्यक्त करणारे लोक आहोत, त्यामुळेच आमच्या विधानांचा विपर्यास करत आम्हाला दडपण्याचा प्रयत्न केला जातो, असे रत्ना यांनी स्पष्ट केले.

कुणी एकाने सांगितलेला विचार सगळ्यांनी अमलात आणायचा, अशा हुकूमशाही पद्धतीचा संवाद सध्या होतो आहे. संवाद हा वेगवेगळ्या पद्धतीने व्हायला हवा आणि त्यासाठी औपचारिक चर्चा होणे आवश्यक आहे. अशी चर्चा तुम्हाला दुसऱ्याचे ऐकायला शिकवते आणि ऐकून-समजून घेऊन तुमचा मुद्दा अधिक सभ्यतेने मांडण्याची संधी देते. चांगल्या चर्चेतून, विचारांच्या आदानप्रदानातून संस्कृती विकसित होत जाते. आज घरापासून देशापर्यंत सगळीकडेच दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. माझेच म्हणणे खरे या वृत्तीमुळे समाजातील संवादच हरवत चालला आहे.

–  रत्ना पाठक-शाह

सहप्रायोजक : झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण

(एस.आर.ए) आणि  एम. के. घारे ज्वेलर्स

बँकिंग पार्टनर :

ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 12:44 am

Web Title: culture does not evolve from dictatorship says ratna pathak shah abn 97
Next Stories
1 हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या!
2 राज्याच्या बहुतांश भागातून थंडी गायब
3 व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांच्या मृत्यूची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक
Just Now!
X