दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा ‘आम आदमी पार्टी’ पक्ष चमत्कार घडविणार का,  सत्ता स्थापनेत पक्षाची निर्णायक भूमिका असणार का  याबरोबरच दिल्लीत हा पक्ष यशस्वी झाल्यास आगामी सार्वत्रिक निवडणुकीत अन्य राज्यांमध्ये हा पक्ष आकारास येईल का, अशा अनेक शंकाकुशंका  केजरीवाल यांच्या पक्षाबाबत व्यक्त केल्या जात आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे रामलीला मैदानावर उपोषण घडवून आणून केजरीवाल यांनी दिल्लीत स्वत:चा प्रभाव निर्माण केल्याची टीका त्यांच्यावर नेहमीच होते. मात्र केजरीवाल यांनी आपले नाव चर्चेत राहिल याची पुरेपूर खबरदारी गेले वर्षभर घेतली. ‘रिलायन्स’ कंपनीच्या महागडय़ा बिलांमुळे बेजार झालेला मध्यमवर्गीय किंवा झोपडपट्टीधारकांना आधार दिला. कंपनी सामान्य ग्राहकांची लूटमार करीत असल्याने बिले भरू नका, असे आवाहन केले. वीज, पाणी यासारख्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले. दिल्लीत काँग्रेस किंवा भाजप हे दोनच प्रमुख पक्ष असताना तिसरा पर्याय केजरीवाल यांनी उपलब्ध करून दिला. दिल्लीत आम आदमी पार्टीला चांगले यश मिळेल, असा अंदाज सर्वच जनमत चाचण्यांमधून व्यक्त केला गेला.
मात्र आपला पक्ष काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही पक्षांना मदत करणार नाही, असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. तशीच वेळ आल्यास आपला पक्ष फेरनिवडणुकांचा पर्याय स्वीकारेल, असाही केजरीवाल यांचा युक्तिवाद आहे.