९९.३ टक्के रद्द नोटा परत आल्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा अहवाल

निश्चलनीकरणानंतर रद्दबातल ठरलेल्या पाचशे आणि हजार रुपये मूल्याच्या ९९.३ टक्के नोटा पुन्हा बँकांकडे जमा झाल्याची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी उघड केली. यामुळे काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने योजलेला निश्चलनीकरणाचा उपाय पूर्णपणे अपयशी ठरल्याचेच स्पष्ट होत आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने याबाबतची माहिती बराच काळ चालढकल करीत अखेर, २०१७-१८ सालच्या आपल्या वार्षिक अहवालाद्वारे बुधवारी जाहीर केली. निश्चलनीकरणानंतर मर्यादित ५० दिवसांच्या कालावधीत बँकांकडे जमा झालेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या नोटा मोजण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेला दीड वर्षांचा कालावधी लागावा, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात होते. तथापि जमा झालेल्या नोटांची तपासणी, सत्यापन आणि मोजणीचे अवघड काम खूप आव्हानात्मक राहिल्याचे मध्यवर्ती बँकेने नमूद करताना, अतिवेगवान चलन सत्यापन आणि प्रक्रिया प्रणाली (सीव्हीपीएस) द्वारे  ते अचूकपणे पूर्ण केल्याचा दावा अहवालाद्वारे केला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने या अहवालात, निश्चलनीकरणाचे फायदे विशद केले नसले तरी, नवीन नोटांच्या मुद्रण आणि वितरणासाठी झालेल्या खर्चामुळे मध्यवर्ती बँकेकडून सरकारला दिल्या जाणाऱ्या लाभांशाला लागलेली कात्री हे आनुषंगिक नुकसान झाले असल्याचे मात्र सांगितले आहे.

निश्चलनीकरणातून, रोकडरहित व्यवहारांना चालना दिली गेली हा सरकारचा दावाही फोल ठरला असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालाने दाखवून दिले आहे. मार्च २०१८ अखेर चलनात असलेल्या नोटांचे मूल्य आधीच्या वर्षांच्या तुलनेत मार्च २०१६च्या तुलनेत ९.९ टक्क्यांनी तर मार्च २०१७च्या तुलनेत तब्बल ३७.७ टक्क्यांनी वाढून १८.०४ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. निश्चलनीकरणाचा दृश्यमान परिणाम इतकाच की, बनावट नोटांचे चलनातील प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ३१.४ टक्के असे लक्षणीय घटले आहे. २०१७-१८ मध्ये वेगवेगळ्या मूल्याच्या ७.६२ लाख नोटा चलनात फिरत होत्या, त्यांचे प्रमाण ५.२३ लाखांवर घसरले असल्याचे अहवाल सांगतो.

रद्द चलन..

८ नोव्हेंबर २०१६ रोजी १५.४१ लाख कोटी रुपये मूल्याच्या रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांपैकी, १५.३१ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा बँकांकडे परत आल्या. याचा अर्थ रद्दबातल ठरलेल्या केवळ १०,७२० कोटी रुपये मूल्याच्या नोटाच बँकिंग व्यवस्थेत परत आलेल्या नाहीत.

रुपयाचा नीचांक

मुंबई : एका सत्रात काहीसा भक्कम होत ऐतिहासिक मूल्यतळातून बाहेर येणारा रुपया बुधवारी पुन्हा एकदा विक्रमी अवमूल्यन नोंदविता झाला. परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपया एकदम ४९ पैशांनी रोडावत ७०.६५ या नव्या नीचांकाला पोहोचला.

नव्या चलनाचा खर्च

रिझव्‍‌र्ह बँकेला नोटाबंदीपश्चात २०१६-१७ मध्ये नवीन ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी ७,९६५ कोटी रुपये खर्च झाला. हा खर्च आधीच्या वर्षांतील ३,४२१ कोटी रुपयांच्या मुद्रण खर्चाच्या दुप्पट होता. २०१७-१८ मध्ये नवीन नोटांच्या छपाईवर आणखी ४,९१२ कोटी रुपये खर्च झाला असल्याचे अहवाल स्पष्ट करतो. २०१६-१७ मध्ये मध्यवर्ती बँकेने सरकारला लाभांश रूपाने ३०,६५९ कोटी रुपये दिले, जो आधीच्या वर्षांच्या तुलनेत निम्म्याने घटला होता.