News Flash

बाळासाहेबांच्या स्मृती कार्यक्रमालाही चलनकल्लोळाचा फटका!

ठिकठिकाणच्या मोठय़ा कार्यक्रमांवर संक्रांत

नोटाबंदीमुळे नेते, शिवसैनिक हतबल; ठिकठिकाणच्या मोठय़ा कार्यक्रमांवर संक्रांत

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीचा फटका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांना बसला असून आपल्या पोतडीतील ५००-१००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास कुणीच तयार नसल्याने कार्यक्रम रद्द करण्याची वा त्यांचे स्वरुप बदलण्याची वेळ शिवसेनेच्या नेत्यांवर आली आहे. तर उधारीवर साहित्य मिळवून फळ, धान्य, औषध वाटपाचा कार्यक्रम करता येईल का याची चाचपणी शिवसेना नेत्यांनी सुरू केली आहे.

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर यंदा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठय़ा प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्याचे शिवसेनेचे मनसुबे होते. त्यादृष्टीने नेते मंडळी आणि शिवसैनिक कामालाही लागले होते. ठिकठिकाणी कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्याची तयारी सुरू झाली होती. तर पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळविण्याची नामी संधी असल्याचे हेरून काही मंडळींनी मोठय़ा कार्यक्रमांचा घाट घातला होता. मात्र ८ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आणि जनमानसात गोंधळ उडाला. या घोषणेमुळे कार्यक्रमाचे आयोजन करणारे शिवसैनिकही बिथरले.

मंडप डेकोरेटरपासून कार्यक्रम सादर करणाऱ्यापर्यंत सर्वानीच ५००-१००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे नेते मंडळींची पंचाईत झाली आहे. सध्या बँकांमध्ये तोबा गर्दी उसळल्याने १०० रुपयांच्या अथवा नव्या २००० रुपयांच्या नोटा आणायच्या कुठून असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी अवघ्या दोन दिवसांवर आली असताना कार्यक्रमाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने नेते मंडळी पेचात पडली आहेत. नोटा बंदीच्या फटक्याने कार्यक्रम रद्द करण्याची वेळ ओढवू नये म्हणून पैशांचे गणित जुळविण्याची धडपड काहींनी सुरू केली आहे. सध्याचा चलन पेच सुटल्यानंतर पैसे देतो अशी विनवणी नेते मंडळी कार्यक्रम सादर करणाऱ्यांकडे करीत आहेत. परंतु चलन पेच किती काळ चालेल आणि भविष्यात पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नसल्याने अनेकांकडून नकार मिळू लागले आहेत.

छोटय़ा कार्यक्रमांकडे कल

काही नेत्यांनी आपले मोठे कार्यक्रम थेट रद्द करुन टाकले असून त्याऐवजी छोटे कार्यक्रम कसे साजरे करता येतील याची आखणी सुरू केली आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रुग्णालयात फळवाटप, वैद्यकीय तपासणी, गरीबांना धान्य वाटप असे छोटे छोटे कार्यक्रम करण्याकडे शिवसैनिकांचा कल  वाढू लागला आहे. परंतु पदरी असलेल्या ५००-१००० च्या नोटा चालत नसल्याने व बँकेतून मोठी  रक्कम मिळण्याची शक्यता नसल्याने ओळखीचे  व्यापारी,  फळ विक्रेते यांच्याकडून उधारीवर धान्य, फळे मिळतात का याची चाचपणी सुरू केली आहे. उधारीवर फळ, धान्य मिळाल्यास त्याचे वाटप करून स्मृतीदिन साजरा करण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे, असे शिवसेनेच्या एका नेत्यानेच नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:25 am

Web Title: currency shortage for bal thackeray memory program
Next Stories
1 अत्याचाराच्या विळख्यात अल्पवयीन
2 मुंबईकरांसाठी रशियन चित्रपटांची पर्वणी
3 चलनकल्लोळाच्या व्यापात बँक, टपाल कर्मचाऱ्यांना ताप
Just Now!
X