‘व्हीआयपी’ ग्राहकांची कटकट; इतर ग्राहकांच्या रागात भर

पाचशे व एक हजारांच्या नोटांवर आलेल्या बंदीमुळे एकीकडे सामान्य नागरिकांच्या गोंधळात भर पडली असतानाच या चलनकल्लोळात कुणी सर्वाधिक भरडले जात असतील तर ते पोस्ट आणि बँक कर्मचारी. ग्राहकांचे अज्ञान व राग याचा थेट सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागत असतानाच रात्री १२ वाजेपर्यंत बँकेत थांबून सगळे व्यवहार या कर्मचाऱ्यांना पार पाडावे लागत आहेत. इतर ग्राहकांना टाळून आपल्याला प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘व्हीआयपी’ ग्राहकांमुळे या ताणात भरच पडते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रूपयांच्या नोटांवर एका रात्रीत बंदी आणल्याने संपूर्ण देशातच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा देशातील सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असून या नागरिकांच्या रोषाला बँक कर्मचाऱ्यांना थेट सामोरे जावे लागते आहे. पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी प्रत्येक बँक व एटीएम बाहेर गर्दी होत असून मुंबईत बहुतांश ठिकाणी रांगांमध्ये उभे असलेले नागरिक बँक कर्मचाऱ्यांवरच आपला राग काढत असल्याचे दिसत आहे. बँकेच्या व्यवहारांबाबतीत अज्ञान असलेले अनेक जण बँकांची दारे ठोठावत असून त्यांच्या कामाच्या ताणाबरोबरच ग्राहकांच्या अज्ञानामुळे मानसिक तणावही बँक कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

ग्राहक आपल्या अगतिकतेचे खापर कर्मचाऱ्यांवर फोडत आहेत. अजूनही बॅंकांकडे पाचशेच्या नोटा आलेल्या नाहीत. ‘एटीएम मशीन’ जो ‘वेंडर’ चालवतो, त्याचा दोन हजार रूपयांच्या नोटा एटीएममध्ये ठेवणे आणि काढून घेण्याचा ‘प्रोग्राम’ तयार नसल्याची वस्तुस्थिती एका बॅंक अधिकाऱ्यानी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. त्यातही नोटा व्यवस्थित तपासून घेतल्या नाहीत तर सहा महिन्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला रिझव्‍‌र्ह बँकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल ते वेगळे. ते कर्मचाऱ्यांना परवडणारे नाही, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांसमोरील अडचणी मांडल्या

बँक ऑफ इंडियाच्या वाळकेश्वर शाखेचे मुख्य प्रबंधक प्रल्हाद शिवलकर यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. ते म्हणाले, नोटांवरील बंदी मागचे कारण न समजल्याने गोंधळ वाढला आहे. बँकांना नियमित वेळेपेक्षा शाखा दोन तास अधिक सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, ग्राहकांच्या रांगा मोठय़ा असून ते बँक बंद करताना हुज्जत घालतात.

तसेच, पैसे भरण्यास येणाऱ्यांमध्ये खातेधारकांपेक्षा इतरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना कागदपत्रे मागितली की ते कांगावा करतात. बँकेत आम्ही पाच खिडक्या यासाठी सुरू ठेवल्या असून ज्येष्ठ नागरिकांना मी माझ्या कक्षातून सेवा देत होतो. एवढे असूनही मुंबईतील ‘व्हिआयपी’ ग्राहकांचा आमच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावे हा तगादा चालूच आहे. गेल्या दोन दिवसांत बँकेची व्यवहाराची वेळ संपल्यावर आम्ही हिशोब रात्री १२ वाजेपर्यंत करतो आहोत. त्यानंतर घरी पोहचून सकाळी लवकर पुन्हा बँकेत येत आहोत.

यात पहिल्या दिवशी उपासमारच झाली. या बाबी ग्राहकांना कळणाऱ्या नाहीत. तसेच येणारा ग्राहक एकाच वेळी ७ ते ८ जणांच्या ‘पे-स्लिप्स’ घेऊन येतो, मात्र त्या खातेधारकांची ओळख सांगण्यास ते टाळाटाळ करतात.

या काळात आमच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी स्वत सांगू तेव्हा हवी ती रक्कम बँकेला पुरवल्याने ग्राहकांचा खोळंबा झाला नाही. त्यामुळे सोमवारच्या सुट्टीने काहीसा दिलासा मिळाला असला तरी पुन्हा आम्ही महिनाभर पूर्ण क्षमतेने काम करणार आहोत,’ असेही शिवलकर म्हणाले.

पोस्ट कर्मचाऱ्यांची परिस्थिती तर आणखी बिकट आहे. कमी मनुष्यबळ असताना स्वतंत्र ‘एक्चेंज काऊंटर’ उघडून ग्राहकांच्या नोटा बदलून दिल्या जात असल्याचे ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. या काऊंटरला वेळेचे बंधन नाही. आलेल्या नोटा संपेपर्यंत ते चालवावे लागते, अशा शब्दांत एक पोस्ट कर्मचाऱ्याने आपली व्यथा मांडली.

पोस्टाला पोलिस संरक्षणही नाही

पोस्टाला मुळात रोख लवकर मिळत नाही. रोख आणताना पोलीस संरक्षण नाही. पोस्टातही गर्दीत काही बरे-बाईट घडू नये यासाठी पोलीसांचे संरक्षण नाही. नोटा बदलण्याचे काम चालू असते तेव्हाच पोस्टात रोख नेण्यासाठी गाडी येते. मग सगळे संपल्यावर ही जुन्या नोटांची रक्कम मुख्य डाकघरात न्यावी लागते. अनेक पोस्ट ऑफीसमध्ये ‘कॅश काऊंटींग मशीन’ उपलब्ध नाहीत, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.