महिन्याभराच्या आíथक गणितातून काही पैसे काटकसरीने वाचवून ‘भिशी’त टाकणाऱ्या आणि अडअडचणीला तो पैसा वापरणाऱ्या महिलांची ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने चांगलीच पंचाईत झाली आहे. चाळ, झोपडपट्टय़ांमध्येच नव्हे तर अगदी पंचतारांकित टॉवर्समध्येही या प्रकारच्या भिशी चालतात. काही ठिकाणी व्यापाऱ्यांमध्ये चालणाऱ्या भिशीचाही व्यवसायाकरिता वापर केला जातो. परंतु, आता भिशीमध्ये साठलेल्या पाचशे-हजारांच्या नोटांचे करायचे काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

महिन्याकाठी भिशीत साठलेली रक्कम गटातील एका गुंतवणूकदाराला दिली जाते. हा सर्व व्यवहार रोखीने होत असल्याने भिशी चालविणाऱ्यांकडे मोठय़ा प्रमाणावर ५००-१०००च्या नोटा साठून राहिल्या आहेत. या जुन्या नोटांचे करायचे काय अशा संभ्रमात महिला पडल्या आहेत.

शीव येथे घरकाम करून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या कविता जोगळे यांचा सतरा महिलांचा १७ महिन्यांसाठीचा गट आहे. साधारणपणे महिन्याला दोन हजार रुपये प्रत्येक जण गटात टाकतात आणि महिनाअखेरीस कोणा एका महिलेला तिच्या सोयीनुसार गटात साठलेली ३४००० हजार इतकी रक्कम रोखीने दिली जाते. ‘आमच्या गटात साधारण महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पैसे जमा होतात. नोटाबंदीमुळे मोठय़ा रकमेचे करायचे काय, ही समस्या आहे.

वृद्ध महिलांचे हाल

याशिवाय कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक वृद्ध महिलाही घरकाम करताना दिसतात. यापैकी बहुतांश महिलांचे बँकेत खातेही नाही. अशा महिलांचे यामुळे फारच अडचण होणार आहे. ‘घरकामातून माझ्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मी १९ हजार रुपये साठवले. आपल्या दारुडय़ा मुलापासून ते लपवून ठेवले होते. मात्र माझे बँकेत खाते नसल्याने मी जुन्या नोटा कोणाकडून बदलून घ्यायच्या,’ अशा सवाल नाव न लिहण्याच्या अटीवर वडाळ्यातल्या एका ६० वर्षीय आजीने केला.