आठवडाभरानंतरही नोटाबंदीचा गोंधळ कायम

‘आज मध्यरात्रीपासून ५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद होतील..’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला मंगळवारी बरोबर एक आठवडा लोटला तरीही नोटाबंदीमुळे निर्माण झालेला गोंधळ कायम आहे. सोमवारी गुरुनानक जयंतीनिमित्त बंद असलेल्या बँकांची दारे मंगळवारी सकाळी उघडण्यापूर्वीच त्यांच्या दारात नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. गेले आठवडाभर नोटाबंदीचा तोटा सोसून ‘देशप्रेम’ दाखवणाऱ्या नागरिकांच्या संयमाचा बांध आता सुटू लागला असून रांगेत घुसण्याचा प्रयत्न करणे, आरडाओरड, भांडणे, कुरबुरी यांचे दर्शन आता घडू लागले आहे. परंतु, आठवडाभरानंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा नसल्याने बँकांचा वेढा आणखी काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत.

पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता ५०० व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याचे देशभरातून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. ‘दोन-चार दिवसांत सर्व ठीक होईल’ हा आशावाद उराशी बाळगून नागरिकांनी सुरुवातीचे चार दिवस कसेबसे ढकलले. मात्र, आता या निर्णयाला आठवडा लोटल्यानंतरही नोटांचा गोंधळ संपलेला नाही. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसे न उरल्याने बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा वाढत चालल्या आहेत. शनिवारी, रविवारी सलग काम केल्यानंतर गुरुनानक जयंतीनिमित्त सोमवारी बँका बंद होत्या. त्यामुळे सोमवारचा दिवस शांततेत गेला. परंतु, मंगळवारची सकाळ उजाडताच नागरिकांच्या रांगा बँकांसमोर लागल्या. गेल्या सहा दिवसांमध्ये उडालेला गोंधळ लक्षात घेऊन काही बँकांमध्ये पैसे भरणे आणि काढणाऱ्यांच्या रांगा स्वतंत्र करण्यात आल्या होत्या. मात्र या स्वतंत्र रांगा बँकांच्या आत प्रवेश मिळाल्यानंतर सुरू होत होत्या. बँकांबाहेर सरसकट सर्वच नागरिक एकाच रांगेत उभे होते. त्यामुळे बँकांबाहेर गोंधळ उडत होता. काही ठिकाणी रांगेत घुसखोरी, बँक कर्मचाऱ्यांसोबत शाब्दिक चकमकी असे प्रकार घडले. यातून नागरिकांचा संयम हळूहळू सुटत चालल्याचे संकेत मिळत आहेत.  घरात मुला/मुलीची लग्न घटिका समीप आली असताना चलनबंदीमुळे खिशात पैसे नसल्याने बँकांच्या बाहेर रांगेत तासंतास उभे राहण्याची वेळ अनेकांवर ओढवली आहे. त्यांच्याही संतापाचा कडेलोट होत आहे. काही औषधांच्या दुकानांमध्ये ५००-१००० रुपयांची नोट स्वीकारत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक आणि दुकानदारांमध्ये खटके उडू लागले आहेत.

बँका सोमवारी बंद असल्याने मंगळवारी एटीएममधून पैसे काढता येतील, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. त्यामुळे आणखी काही दिवस तरी सगळे व्यवहार ‘प्लास्टिक मनी’च्या माध्यमातून करावे लागतील असे वाटते.  – हरिप्रसाद जाधव (कॉर्पोरेशन बँकेच्या वडाळा शाखेबाहेरील रांगेतून)

आम्ही सकाळी साडेआठ वाजल्यापासून रांगेत उभे आहोत. एरवी मला पगार धनादेशाद्वारे मिळतो. परंतु, यावेळेस रोखीने मिळाला आहे. त्याही जुन्या नोटा आहेत. त्यामुळे त्या बँकेत भरण्याशिवाय गत्यंतर नाही. पगारजमा करण्यासाठी मला एक दिवस खाडा करावा लागला आहे.  – दक्षिता, नोकरदार तरूणी, (वांद्रे पश्चिमेकडील आय.सी.आय.सी.आय बँकेबाहेरील रांगेतून)

पुढच्या आठवडय़ात मुलीचे लग्न आहे. घरात लगीनघाई आहे, पण खिशात पैसे नाहीत. सोमवारी बँका बंद असल्याने पैसे मिळू शकले नाही. त्यामुळे खरेदी करता आली नाही.  – शलाका पवार, गृहिणी (बँक ऑफ इंडियाच्या वडाळा शाखेबाहेरील रांगेतून)

सध्या परीक्षा सुरू असताना अभ्यास सोडून पैशांसाठी बँकेबाहेर रांगेत उभे राहावे लागत आहे. चलनबंदीच्या निर्णयानंतर घरात होते तेवढय़ा पैशात घरखर्च चालविण्यात आला. बचतीसाठी घरत ठेवलेली पिगी बँकही फोडली आणि सुट्टे पैसे मिळवले. पण तेही आता संपत आले आहे. त्यामुळे अभ्यास वाऱ्यावर सोडून बँकेबाहेर धाव घ्यावी लागली. – पूजा मोरे, विद्यार्थिनी (आयसीआयसीआय बँकेच्या दादर शाखेबाहेरील रांगेतून)

बहुसंख्य एटीएम बंदच

गेले आठ दिवस बंद असलेली एटीएम मंगळवारी सुरू असतील असा विचार करुन अनेकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. परंतु एटीएममध्ये रोकड नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. मुंबईतील बहुसंख्य एटीएम केंद्रे मंगळवारी बंदच होती. त्यामुळे नागरिकांना बँकांबाहेर लागलेल्या रांगेत उभे राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.