News Flash

करी रोड पादचारी पुलाचा मार्ग बदलणार

प्राथमिक आराखडय़ाबाबत पालिकेची हरकत

पादचारी पूल दुर्घटनेनंतर लष्कराकडून करी रोड येथे बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचा आराखडा पालिकेच्या विनंतीनंतर बदलण्यात येणार आहे. नुकत्याच नूतनीकरण केलेल्या बागेचे या पुलामुळे नुकसान होत असल्याची बाब पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे व लष्कर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे पर्यायी जागा देण्याचीही तयारी दाखवल्याने पुलाचा आराखडा बदलण्यास तत्त्वत संमती मिळाली आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पुलावर २९ सप्टेंबर रोजी चेंगराचेंगरीमुळे २३ जणांचा बळी गेला तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर एल्फिन्स्टनसह करी रोड व आंबिवली स्थानकांवर लष्कराकडून पादचारी पूल बांधून घेण्याचा निर्णय झाला. हे पूल महापालिका, रेल्वे व लष्कराच्या सहकार्याने बांधण्यात येणार असून पादचारी पुलाचा उताराचा मार्ग बांधण्यासाठी तातडीने जमीन देण्याची तयारी पालिकेने दाखवली.

करी रोड परिसरात मोकळ्या जागांची कमतरता आहे. त्यामुळे नुकतेच विकसित केलेले मैदान गेल्यास स्थानिकांना त्रास होईल. हे आम्ही रेल्वे व लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनाही ते योग्य वाटले, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल म्हणाले. मैदानाच्या पुढच्या बाजूने पादचारी पूल उतरवल्यास प्रवाशांनाही तो सोयीचा पडेल.

लालबाग परिसरातून येणाऱ्या प्रवाशांना या पुलाचा उपयोग होणार असल्याने गणेशोत्सव काळातील गर्दीच्या दृष्टीनेही तो योग्य होईल. या पुलाच्या आराखडय़ाबाबत काही शंका असल्यास पालिकेचे अभियंते मदत करणार आहेत, असेही पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राथमिक आराखडय़ाबाबत पालिकेची हरकत

करी रोड येथील पुलाच्या प्राथमिक आराखडय़ाबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही हरकती नोंदवल्या. मूळ आराखडय़ानुसार करी रोड पुलाच्या उताराचा भाग मनोरंजन मैदान (आरजी) म्हणून राखीव असलेल्या जागेत उतरत होता. महानगरपालिकेने तीन कोटी रुपये खर्च करून नुकतेच या जागेचे नूतनीकरण केले होते. त्यामुळे प्रवाशांनाही सोयीचे होईल याप्रमाणे आराखडय़ात बदल करण्याच्या सूचना महानगरपालिकेने केल्या. याबाबत रेल्वे अधिकारी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्यासोबत बैठक झाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:46 am

Web Title: currey road bridge location change
Next Stories
1 ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर नाटय़कलेचे मर्म उलगडणार!
2 रेल्वेतील कंत्राटदार कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारींमध्ये वाढ
3 मूग, उडीद, सोयाबीनची तातडीने खरेदी करा
Just Now!
X