इंद्रायणी नार्वेकर

अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचना; गणेशोत्सवात गणेशमूर्तीची वाट बिकट होणार

मध्य मुंबईतील लोअर परळचा पूल धोकादायक ठरल्यामुळे पाडून टाकल्यानंतर आता करी रोड आणि चिंचपोकळीचा पूलही अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरवण्यात आला आहे. या दोन्ही पुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचना आयआयटीने पाहणी करून केल्या आहेत. त्यामुळे

पालिकेने आता या पुलावर उंची अटकाव (हाइट बॅरिअर्स) उभारण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, तसे झाल्यास येत्या गणेशोत्सवात गिरगाव चौपाटीच्या दिशेने जाणाऱ्या उंच गणेशमूर्तीच्या मिरवणुकीचा मार्ग बदलावा लागणार आहे.

हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे पुन:सर्वेक्षण गांभीर्याने करण्यात येत आहे. त्यातच पूल विभागाने सर्वेक्षणासाठी आयआयटीचीही मदत घेतली आहे. आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान मध्य मुंबईतील करी रोड आणि चिंचपोकळी हे दोन पूल धोकादायक स्थितीत आढळून आले आहेत. हे पूल तातडीने अवजड वाहनांसाठी बंद करावेत, अशा सूचना आयआयटीने पालिकेला केल्या आहेत. चिंचपोकळीचा पूल एफ दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीत येतो, तर करी रोडच्या पुलाचा अर्धा भाग जी दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीत येतो. अवजड वाहनांसाठी हे पूल बंद करण्याकरिता पालिका या दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूंना उंची अटकाव (हाइट बॅरियर्स) लावणार आहे. आधीच लोअर परेलचा पूल पाडून टाकल्यामुळे पूर्व आणि पश्चिम दिशेला जाण्यासाठी वाहनांना प्रभादेवी स्थानकावरील एलफिन्स्टन पूल आणि करी रोड पूल व चिंचपोकळी पुलाचाच पर्याय होता. मात्र हे दोन पूल बंद झाल्यास एलफिन्स्टन पुलावर जाण्यासाठी होणाऱ्या वाहतूक कोंडीत भरच पडणार आहे.

चिंचपोकळी आणि करी रोड या पुलांची स्थिती नाजूक असून त्यावरील अनावश्यक भार (डेड लोड) तातडीने काढून टाकण्याचे आदेश पूल विभागाने एफ दक्षिण विभाग कार्यालयाला दिले आहेत. या पुलावरील उपयोगिता वाहिन्यांचा भार कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार काही

मोबाइल कंपन्यांच्या ज्या वाहिन्या वापरात नाहीत अशा वाहिन्या नुकत्याच काढून टाकण्यात आल्या आहेत. तर पाण्याचीही एक वापरात नसलेली वाहिनी काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पूल विभागाकडून उंची अटकावसाठी निधी उपलब्ध झाला की तातडीने ते बसवण्यात येतील व अवजड वाहनांसाठी हे पूल बंद केले जातील, अशी माहिती विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मिरवणुकींची अडचण

दोन्ही पूल अवजड वाहनांसाठी बंद केल्यास त्याचा सर्वाधिक फटका गणेशोत्सवात बसण्याची भीती स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी व्यक्त केली आहे. दादर चौपाटीवर दहा फुटापेक्षा जास्त उंच गणेशमूर्तीच्या विसर्जनाला बंदी असल्यामुळे पूर्व उपनगरातून विसर्जनासाठी येणाऱ्या सर्व मूर्ती चिंचपोकळी पुलावरून गिरगाव चौपाटीच्या दिशेने जातात. मात्र हे दोन पूल अवजड वाहनांसाठी बंद केल्यास शेकडो गणेश मंडळांना पर्यायी मार्ग द्यावा लागेल. अनेक वर्षांपासूनचे हे विसर्जनाचे मार्ग ठरलेले असल्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.