मध्य रेल्वे सुरक्षा दलाचा प्रस्ताव; वर्षभरात सुरक्षा सामग्रीत वाढ होणार

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर यासह गर्दीच्या एकूण पाच उपनगरीय स्थानकांच्या व लोकमान्य टिळक टर्मिनसवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ आणि आवश्यक ते फेरबदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. तसा प्रस्ताव तयार तयार करण्यात आला असून, साधारण वर्षभरात या सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचा पसारा सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा, पनवेल, गोरेगावपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज ४० ते ४२ लाख प्रवासी ये-जा करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान ठिकठिकाणी तैनात असतात. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मध्य रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेत ‘एकात्मिक सुरक्षा प्रणाली’अंतर्गत वाढ करण्यात आली. यात सीसीटीव्ही, दरवाजातील धातूशोधक, हातात घेऊन तपासणी करण्याचे धातूशोधक, श्वान पथकांच्या संख्येत वाढ करण्यात आली होती. कमांडोही तैनात करण्यात आले होते. मात्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यास बरीच वर्षे लागली.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ केल्यानंतर वाढलेली प्रवासीसंख्या, त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांवर पडणारा कामाचा ताण आणि अपुरी सुरक्षा सामग्री लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सतत प्रवाशांची गर्दी होत असलेल्या पाच उपनगरीय स्थानक व मेल-एक्स्प्रेस सुटणाऱ्या एका टर्मिनसची निवड करण्यात आली आहे. यात सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण स्थानकांचा आणि लोकमान्य टिळक टर्मिनसचा समावेश आहे.

या सर्व स्थानकांमध्ये बदल करतानाच तेथील अधिकृत व अनधिकृत प्रवेशद्वारे, श्वान पथके, धातूशोधक यंत्रे इत्यादींची माहिती घेण्यात आली. सध्या सीएसएमटी स्थानकात सुरक्षेच्या कारणास्तव प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे सुरक्षा दलाने अनावश्यक प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीचे स्थानक असलेल्या सीएसएमटीत प्रवासी सर्व बाजूंनी प्रवेश करतात. त्यामुळे सुरक्षेवर लक्ष ठेवणे अशक्य होते आणि सुरक्षा दलाच्या जवानांवरही मोठा ताण पडतो. त्यामुळे फक्त आवश्यक  प्रवेशद्वारे खुली ठेवून बाकी सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून केलेले हे नियोजन प्रवाशांनी तूर्त स्वीकारले आहे. अशाच प्रकारचे बदल उर्वरित पाच उपनगरीय स्थानके व एका टर्मिनसमध्ये करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवरील पाच उपनगरीय स्थानके व एका टर्मिनसच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयालाही पाठवला आहे. साधारण एका वर्षांत मोठे बदल केले जातील.

– अश्रफ के.के., वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे