28 September 2020

News Flash

तक्रारींसाठी ग्राहकांच्या रांगा

सलग दुसऱ्या महिन्यातही ‘बेस्ट’च्या वाढीव वीजदेयकांचा धक्का !

संग्रहित छायाचित्र

सलग दुसऱ्या महिन्यात बेस्टच्या वीजग्राहकांना भरमसाट वीज देयके आकारण्यात आल्याची तक्रार आहे. टाळेबंदीमुळे आर्थिक नियोजन कोलमडल असताना वाढीव वीजदेयकांमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. याबाबत तक्रारी करण्यासाठी बेस्टच्या भरणा केंद्रांवर ग्राहकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

मुंबईच्या शहर भागात बेस्टतर्फे वीजपुरवठा केला जातो. बेस्ट वीजग्राहकांना जुलै—ऑगस्ट महिन्यात वाढीव देयके आली आहेत. ज्यांच्या घरात एक पंखा, एक दिवा आणि दोन—चार आवश्यक उपकरणे आहेत, अशांनाही ५ ते १० हजारांचे देयक आकारण्यात आले आहे. ही सर्व मंडळी बेस्टच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांत दाद मागण्यासाठी खेटे घालत आहेत. परंतु, ‘सव्‍‌र्हर डाऊन आहे, दोन तास थांबा, संकेतस्थळाला भेट द्या’ असे सांगून त्यांची बोळवण केली जात आहे.

‘गेले दोन तास आम्ही या रांगेत उभे आहोत. वृध्द असूनही कुणी दखल घेत नाही. देयकाबाबत स्पष्ट उत्तर देत नाहीत. घरात केवळ दोन माणसे राहतात. पूर्वी ५०० रुपये देयक यायचे, आता थेट ५ हजार आकडा कसा, याचे उत्तर कुणीही देत नाही,’ अशी तक्रोर माहीम येथील तरे यांनी के ली. विशेष म्हणजे या रांगेतील प्रत्येकाने आधी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. परंतु तो उचलला जात नाही म्हणून या सर्वानी वाहतुकीच्या पुरेशी व्यवस्था नसतानाही कार्यालयात धाव घेतली. सकाळी ११ वाजता आलेल्या तक्रारदारांनाही २ पर्यंत थांबवले जाते. तर, काहींना उद्या या, असेही सांगितले जाते.

व्यवसाय बंद, तरी वाढीव देयके

धारावी, अशोक नगर येथील अक्रम खान यांचा कपडय़ांचा व्यवसाय आहे. पूर्वी कारखाना सुरू असताना त्यांना महिना ६ ते ७ हजार रुपये देयक यायचे. कारागीर गावाला गेल्याने तीन महिने कारखाना बंद होता तरीही देयक ४८ हजारांचे आकारण्यात आले आहे. अक्रम यांनी दीड तास रांग लावूनही त्यांना घरी पाठवण्यात आले. गेले तीन महिने व्यवसाय बंद असल्याने देयक भरायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. माहीम येथील गिरीश राव यांना दर महा साधारण २००० रुपये देयक यायचे. त्या देयकाची पूर्तता करूनही १३ हजारांचे देयक पाठवण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता किंवा जे लोक गावालाच गेले होते व घर बंद होते अशा ग्राहकांना बेस्टच्या संबंधित प्रभागात जाऊन तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच बेस्टच्या खास तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डवर जाऊन आपल्या बिलाबाबत माहिती घ्यावी, असेही बेस्टने म्हटले आहे.

पुढील महिन्यातही?

टाळेबंदीच्या तीन महिन्यांच्या काळात मार्च महिन्याच्या देयकानुसार अंदाजे विजेचे युनिट आकारण्यात आले होते. तर जून महिन्यापासून प्रत्यक्ष मीटर रिडींग घेण्यास सुरूवात झाली आहे. टाळेबंदीमध्ये सर्व जण घरी असल्यामुळे  आणि उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे वीजेचा वापर अधिक होत होता. त्यामुळे हे अधिकचे युनिट देयकात जोडले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिकचे युनिट एकाच महिन्यात न जोडता तीन महिन्यात जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यातही वाढीव बिल येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 12:39 am

Web Title: customer queues for complaints of increased electricity bills abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 गुन्हे दाखल असूनही पोलीस प्राधिकरणावर नियुक्ती
2 ‘६३मून्स’प्रकरणी चिदम्बरम यांची चौकशी
3 कोकणासाठी गणेशोत्सव विशेष रेल्वेगाडय़ांची प्रतीक्षाच
Just Now!
X