मुंबईचा दहावीचा एकूण निकाल गेल्या वर्षीपेक्षा थोडा कमी झाला असला तरी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने अकरावी प्रवेशाची ‘कटऑफ’ गेल्या वर्षीच्या तुलनेत वधारण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी गणित आणि विज्ञानाचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. शिवाय या विषयांमधील ‘उच्चतम विचार कौशल्यां’वर (हायर ऑर्डर थिंकिंग स्कील-हॉट्स) आधारित प्रश्नांनी अनेकांना झोपविले होते. त्यामुळे फार कमी विद्यार्थी ९० टक्क्यांचा ‘जादूई आकडा’ गाठू शकले होते. पण आता या प्रश्नांच्या स्वरूपाला सरावल्याने अनेक विद्यार्थ्यांना या विषयाच्या मदतीने एकूण निकालातही आपली कामगिरी बऱ्यापैकी उंचावता आली आहे (पाहा चौकट). इतकेच नव्हे तर या विषयातील उत्तीर्णतेचे प्रमाणही वाढले आहे. इंग्रजीने (प्रथम भाषा) विद्यार्थ्यांना दगा दिल्याचे दिसते. गेल्या वर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी अवघे १.९६ टक्के होते. यंदा हा आकडा ३.१६ वर गेला आहे. ५ ते ९० टक्केदरम्यान गुण मिळविणाऱ्यांच्या संख्येतही यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्षीअकरावी प्रवेशासाठीची ‘कटऑफ’ थोडीफार वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतून दहावीची परीक्षा देणाऱ्या ३,११,९२८ पैकी २,७७,३५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ८८.९२ टक्के आहे.

राज्याचा दहावीचा निकाल ८३.४८ टक्के
राज्याचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून विशेष श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी तब्बल ४१ हजार २४६ ने वाढली आह़े  प्रथम श्रेणीत उतीर्ण होणाऱ्यांचाही आकडा मोठा आह़े  त्यामुळे अकरावीत चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविण्यासाठीची या वर्षी स्पर्धा वाढणार आहे. दहावीचा राज्याचा निकाल ८३.४८ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात दोन टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. या वर्षीही मुलींनीच बाजी मारली असून ८४.९० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.२४ टक्के  आहे.

इतर विभागांच्या तुलनेत खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असूनही मुंबईने आपली चांगल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे.
– लक्ष्मीकांत पांडे
अध्यक्ष, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ