कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरण

कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्यासंदर्भात इंटरपोलमार्फत एसआयटीकडून २८ देशांना पत्रे देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या ७८ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात मदत करण्याचे आवाहन या पत्रांमध्ये करण्यात आले आहे.

कॉसमॉस बँकेच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या सव्‍‌र्हरवर हॅकर्सनी हल्ला चढवत ‘रूपे डेबिट कार्ड’ आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम काढली होती. यातील १३ कोटी रुपयांची रक्कम हॅनसेंग बँकेच्या खात्यात जमा केली होती आणि ७८ कोटी रुपये काही देशांमधील बँकांमध्ये जमा झाले होते. २८ देशांच्या यादीत संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, रशिया, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे. एटीम कार्ड क्लोन करून पैसे चोरी करण्यात आले आहेत.

‘प्रामुख्याने ७८ कोटी रुपये कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. ज्यात आम्हाला थोडी कसरत करावी लागणार आहे. इंटरपोलच्या मदतीने आम्ही पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतातील अडीच कोटी रुपयांच्या संदर्भात आम्ही पहिल्या दिवसापासून वसुली करायला सुरुवात केली आहे’, असे कॉसमॉस बँकेसंदर्भात स्थापन केलेल्या एसआयटीच्या मुख्य व सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यांनी सांगितले.