महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संगणकीय प्रणालीवर २१ मार्चच्या मध्यरात्री सायबर हल्ला करण्यात आला. मात्र सायबर तज्ञांसह महामंडळाच्या तंत्रज्ञांनी हा हल्ला निकामी करण्यात बऱ्याच अंशी यश मिळवले आहे. संकेतस्थळासह बहुतांश ग्राहकाभिमुख सेवा सुरू  झाल्या असून उर्वरित सेवा बुधवारपर्यंत सुरू होतील, अशी माहिती महामंडळाने दिली.

२१ मार्चच्या मध्यरात्री ‘सायनॅक’ या रॅन्समवेअरने महामंडळाच्या सव्र्हर यंत्रणा आणि संग्रहित माहितीआधारे सुरू असलेल्या सेवांवर परिणाम केला. या हल्ल्यामुळे महामंडळाच्या राज्यातील प्रादेशिक कार्यालयांमधील सेवा बाधित झाल्या. हल्लेखोरांनी ईमेलद्वारे हल्ल्याची माहिती दिली, असे महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांनी सांगितले.