परदेशातील अनोळखी तरुणासोबत फेसबुकवर केलेली मैत्री जे. जे. मार्ग परिसरात राहणाऱ्या विवाहितेला महागात पडली. कर्करोगग्रस्तांना मदत करण्याच्या निमित्ताने तिला तब्बल साडेचार लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

सुमय्या मोमीन असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. तीन महिन्यांपूर्वी मॅक्स जोहान्स नावाच्या तरुणाशी सुमय्याची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. कर्करोगाने पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्करोगग्रस्त नागरिकांना मदत करण्याची इच्छा असल्याचा प्रस्ताव मॅक्स याने सुमय्या हिच्यासमोर ठेवला. काही दिवसांनी ३० हजार पाउंडस्, मोबाइल, चॉकलेट, अत्तर अशा वस्तू पाठवत आहे. यातल्या वस्तू तू ठेव आणि पैसे कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी खर्च कर, असा निरोप मॅक्सने सुमय्याला पाठवला. दोन दिवसांनी एका महिलेने सीमाशुल्क विभागातील अधिकारी असल्याचे भासवून सुमय्याशी संपर्क साधला. दिल्ली विमानतळावर तुमच्या नावाने पार्सल आले आहे. त्यात परदेशी चलन, मोबाइल आणि अन्य वस्तू आहेत. त्यावर कर म्हणून साडेचार लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार सुमय्याने विविध खात्यांमध्ये साडेचार लाख रुपये भरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम भरल्यानंतर आणखी पाच लाख रुपयांसाठी सुमय्याला फोन आला. पार्सलमध्ये परकीय चलन असल्याने दहशतवादविरोधी पथकाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असे तिला सांगण्यात आले. मात्र यात काहीतरी काळेबेरे आहे, असे लक्षात आल्यावर तिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.