पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेल्या सायबर गुन्ह्य़ांची उकल करण्याबरोबरच असे गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ४७ सायबर पोलीस ठाणी निर्माण करण्यात आली आहेत. त्यांना स्वतंत्र  पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात येणार असल्याने भविष्यात सायबर हल्ले, फेसबुकच्या माध्यमातून समाजात असंतोष पसरविणाऱ्यांना गजागाड करण्यास मदत होणार असल्याची माहिती गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली.

राज्यात सध्या १०९३ पोलीस ठाणी असून मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुल आणि ठाण्यात कासारवडवली अशी दोनच सायबर पोलीस ठाणी आहेत. या दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही सायबर गुन्ह्य़ांच्या उकलीबाबत परिपूर्ण ज्ञान नसल्याने अनेक गुन्ह्य़ांचा तपास अडकून पडला आहे. एकीकडे राज्यातील गुन्हय़ांमध्ये पडणारी दोन हजार सायबर गुन्ह्य़ांची भर, तर दुसरीकडे अशा गुन्ह्य़ांच्या तपासात येणाऱ्या अडचणी यांचा विचार करून आता प्रत्येक जिल्ह्य़ात सायबर एक किंवा दोन पोलीस ठाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या आठवडाभरात त्यांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे एकसारखी रचना असलेली यातील ४४ पोलीस ठाणी सुरू झाली असून उर्वरित तीन पोलीस ठाणीही लवकरच सुरू होतील. गुन्हा दाखल करण्यापासून आरोपींना शिक्षा होईपर्यंतची सर्व प्रक्रिया या पोलीस ठाण्यांमधूनच होणार आहे. त्याशिवाय सायबर हल्ले, फेसबुकच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी किंवा समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्यांनाही लगाम लावण्याचे काम हे पोलीस करतील. सी-डॅक कंपनी आणि गृह विभागाच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली असून पाच वर्षांपर्यंत सी-डॅक कंपनीचे तज्ज्ञ पोलिसांना मदत करण्याबरोबरच प्रशिक्षणही देणार आहेत. त्यानंतर पोलीसच ही ठाणी चालवतील असेही बक्षी यांनी सांगितले.