महाराष्ट्राच्या वीजपुरवठा यंत्रणेचे संचालन आणि नियंत्रण करणाऱ्या संगणक यंत्रणेत (स्काडा) परदेशातून सायबर घुसखोरी झाल्याने गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा बंद पडला होता, असे सायबर पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे त्यावेळच्या वीजपुरवठा यंत्रणेतील बिघाड हे चीनचे कारस्थान असल्याच्या अमेरिकी कंपनीच्या अहवालात तथ्य असल्याचे मानले जाते.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा ४०० के व्ही वाहिनीत बिघाड होऊन १२ ऑक्टोबर २०२० रोजी वीजपुरवठा यंत्रणा बंद पडल्याने मुंबई आणि ठाणे-रायगड पट्टय़ातील वीजपुरवठा सकाळपासून रात्रीपर्यंत खंडित झाला होता. यामागे परदेशातून झालेला सायबर हल्ला असू शकतो अशी शक्यता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. तसेच याबाबत सायबर पोलिसांना तपास करून अहवाल देण्यास सांगण्यात आले होते.

अमेरिके तील वृत्तपत्रात सोमवारी मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनमधून झालेला सायबर हल्ला असल्याचा संशय व्यक्त करणारा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यामुळे खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी सायंकाळी सायबर पोलिसांचा प्राथमिक तपास अहवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिला. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सायबर शाखेचे महानिरीक्षक यशस्वी यादव आणि तज्ज्ञ मंडळी यावेळी उपस्थित होती.

मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने वीजपुरवठय़ाचे संचालन व नियंत्रण करणारी संगणकीय यंत्रणा (स्काडा) तपासली. यात ८ जीबी क्षमतेचा अनावश्यक विदा (डेटा), ‘स्काडा’ यंत्रणेत सायबर प्रवेश करण्याचे (लॉगिन) बाह्य़ यंत्रणेतून झालेले प्रयत्न आणि सायबर हल्ला करण्यासाठी सोडलेले १४ संगणकीय विषाणू (ट्रोझन हॉर्स) असे सायबर घुसखोरीचे प्रयत्न यंत्रणेत आढळल्याचे मुंबई पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.

पोलिसांच्या अहवालात सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त झाला आहे. शिवाय, अमेरिके तील वृत्तपत्रात ‘रेकॉर्डेड फ्युचर्स’ या कं पनीच्या हवाल्याने एक अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यास चीनचा सायबर हल्ला कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, असे नमूद करत पोलीस पुढील तपास करत आहेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पण मुंबई पोलिसांच्या अहवालात चीनचे नाव आहे की नाही हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

या घटनेबाबत चार तपास अहवाल मागविले होते. त्यापैकी तीन आधीच आले होते. आता हा सायबर पोलिसांचा अहवाल आला आहे. सर्व अहवालातील निष्कर्ष तपासून नंतरच यावर भाष्य करू, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. मुंबईत वीजपुरवठा बंद पडला त्याच दिवशी सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. पण लोकांनी ते हसण्यावारी नेले, असे राऊत खेदाने म्हणाले.

चीनचा इन्कार

चिनी हॅकर्सनी संगणक प्रणालीत घुसखोरी करून मुंबईचा वीजपुरवठा बंद पाडल्याच्या आरोपाचा चीनने इन्कार केला आहे. आरोप आम्हाला मान्य नाही, भारताच्या वीज नियंत्रण प्रणालीत आम्ही घुसखोरी केलेली नाही. त्यामुळे हे आरोप बेजबाबदारपणाचे आणि वाईट हेतून केलेले आहेत, असे  चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी स्पष्ट केले.  चीनविरोधात असला बदनामीकारक प्रचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अमेरिकी कंपनीच्या अहवालात काय?

वॉशिंग्टन : चिनी सरकारशी संबंधित ‘रेडएको’ गटाच्या हॅकर्सनी संगणकीय विषाणूद्वारे (मालवेअर) भारताची वीज संचालन आणि नियंत्रण प्रणाली हॅक केली होती. त्यामुळेच गेल्या वर्षी मुंबईत १२ ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित झाला होता, असा दावा अमेरिकेतील ‘रेकॉर्डेड फ्युचर’ कंपनीने केला आहे. त्याचे वृत्त न्यू यॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केले. या हल्ल्याची माहिती भारत सरकारच्या संबंधित खात्यांना देण्यात आली होती, असेही ‘रेकॉर्डेड फ्युचर’ कंपनीच्या अहवालात स्पष्ट केले आहे. मुंबईतील वीजपुरवठा खंडित करण्यामागे चीनचा काही तरी हेतू असावा किंवा त्यातून त्याला ‘भारताने सीमेवर प्रतिकार केला तर आम्ही विपरीत मार्ग अवलंबू शकतो’, हे सुचवायचे होते, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.