22 September 2019

News Flash

सायकल चोराला अटक, २७ सायकली हस्तगत 

सायकल चोरून त्यांची विक्री करणाऱ्या सराईत चोराला दहिसर पोलिसांनी जेरबंद केले

सायकल चोरून त्यांची विक्री करणाऱ्या सराईत चोराला दहिसर पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून २७ सायकली जप्त केल्या आहेत. राम तिवारी ऊर्फ राजू चव्हाण असे आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे.

राम हा उच्चभ्रू सोसायटी आणि मध्यम वस्तीत नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या सायकल चोरत असे. चोरलेली सायकल आपल्या मालकीची असून पैशांची गरज असल्यामुळे ती विकत असल्याचे तो दुकानदारांना सांगायचा. सायकल विक्रीसाठी जाताना तो उंची पेहराव करीत असल्याने दुकानदारांनाही संशय येत नसे.

दहिसर परिसरातून रामने सायकल चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सुरेश रोकडे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मगर यांच्या पथकाने रामला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी २७ सायकली जप्त केल्या. तसेच आणखी काही सायकली मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात चार गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी दिली.

First Published on September 11, 2019 12:45 am

Web Title: cycle thief arrested akp 94