पश्चिम बंगालच्या किनाऱ्याजवळ निर्माण झालेले कोमेन चक्रीवादळ गुरुवारी जमिनीवर थडकले. यामुळे प. बंगाल व ओडिशामध्ये प्रचंड पाऊस पडत असून त्याच्या परिणामस्वरूप विदर्भातही पावसाच्या मोठय़ा सरी येण्याचा अंदाज आहे. कोमेन वादळाचा प्रभाव राज्याच्या उर्वरित भागांवरही पडणार असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ातही मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान, मुंबई-कोकणातही पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे.
गेले चार दिवस एकाच जागी स्थिर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे वादळात रूपांतर होऊन ते पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर आले. या वादळामुळे ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये वेगवान वारे सुटले आहेत त्याचप्रमाणे वेधशाळेने या दोन्ही राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोमेने वादळामुळे या दोन्ही राज्यांत जलप्रपात होण्याची भीती असली तरी दीड महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्राला मात्र दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जूनमधील पहिल्या टप्प्यानंतर कोकण वगळता इतर ठिकाणी रुसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. कोमेन वादळाच्या मदतीमुळे राज्याच्या अंतर्गत भागात सर्वत्र पावसाच्या सरी येण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने मांडला आहे. शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र व विदर्भात सरींना सुरुवात होणार असून आतापर्यंत सरासरीच्या केवळ ४५ टक्केपाऊस पडलेल्या मराठवाडय़ात शनिवारपासून पावसाची रिपरिप सुरू होईल. कोकण किनारपट्टीवर ठाणे व रायगड जिल्ह्य़ांत गेले काही दिवस चांगला पाऊस होत असून पुढील पाच दिवसही कोकणात पावसाची शक्यता आहे.

राजस्थानातील जोर ओसरला
राजस्थानवरील वादळसदृश्य कमी दाबाच्या पट्टय़ाचा प्रभाव ओसरत आहे. राजस्थान व गुजरातमध्ये यामुळे गेले चार दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्याचप्रमाणे यामुळे कोकण किनाऱ्यावरही पाऊस पडत होता. आता राजस्थानवरील कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले असले तरी कोमेन वादळामुळे कोकणातील पाऊस सुरू राहील.