सोमवारी रात्री मुंबईतील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी कोसळल्या होत्या. पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात मॉन्सूपूर्व सरी कोसळल्या असून सांताक्रुझमध्ये 40 मिलिमीटर तर तर कुलाब्यामध्ये 25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळून ‘वायू’ चक्रीवादळ जाणार असल्याने 11 आणि 12 जून रोजी मुंबईसहित मुंबई उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ‘स्कायमेट’ या खाजगी हवामान संस्थेने वर्तवली आहे.

अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळ 15 किलोमीटर प्रति तास वेगाने कारवार आणि गोवा किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. तसेच जसजसे हे ‘वायू’ चक्रीवादळ पुढे सरकरत जाईल, तशी त्याची तीव्रता वाढत जाईल आणि संध्याकाळपर्यंत त्याचे तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळात रूपांतर होईल. परिणामी मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून वातावरण अंशत: ढगाळ राहिल, असे मत ‘स्कायमेट’ने वर्तवले आहे. तसेच आज (मंगळवारी) संध्याकाळी मुंबईसह मुंबई उपनगरांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील 2 ते 3 दिवसांत मुंबईत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार असून दिवसा हवेतील आर्द्रता वाढेल. याबरोबरच येत्या काही दिवसांमध्ये मान्सून मुंबईत धडक देईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी रात्री विजांच्या कडकडासह मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. यामुळे वाढत्या तापमानात घट झाली असून सामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर मान्सूनच्या प्रतिक्षेत होते. पंरतु सोमवारी मान्सूनपूर्व सरींनी मुंबईकरांना दिलासा दिला. दरम्यान, ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 11 आणि 12 जून रोजी मुंबईसह मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्या चक्रीवादळाला ‘वायू’ हे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी बंगालच्या खाडीत ‘फॅनी’ हे चक्रीवादळ निर्माण झाले होते. तसेच ते ओदिशाच्या किनारपट्टीला धडकले होते. त्याचा ओदिशाला मोठा फटका बसला होता.